Thu, Jul 18, 2019 02:27होमपेज › Ahamadnagar › ..तर घोटणच्या धर्तीवर आंदोलन

..तर घोटणच्या धर्तीवर आंदोलन

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 23 2017 10:54PM

बुकमार्क करा

पाथर्डी : शहर प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील साखर कारखान्यांप्रमाणे वृद्धेश्वर कारखाना उसाला भाव देत नसल्याच्या कारणावरून घोटणच्या धर्तीवर कृती समितीने रणशिंग फुंकले असून येत्या चार तारखेला खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको व गव्हाणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून कारखाना परिसरातील सर्व गावांमध्ये सभा घेण्यापासून जनजागृती करुन 30 डिसेंबरला मिरी येथे महामेळावा होणार असल्याचे कृती समितीने जाहीर केले आहे. 

जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, माजी सदस्य शिवशंकर राजळे, ऊस उत्पादकांचे नेते अमोल वाघ, अनिल ढाकणे, शेतकरी संघटनेचे शरद मरकड, दत्ता फुंदे, रामकिसन शिरसाट, संदीप राजळे आदींसह विविध गावांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेस उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना व वृद्धेश्वर ऊस उत्पादक संघर्ष समितीने गेल्या महिन्याभरापासून कारखान्याने पहिला हप्‍ता 2 हजार 550 रुपयांप्रमाणे द्यावा, या मागणीसाठी आंदोलन हाती घेतले आहे. वृद्धेश्वरने 2150 प्रतिटन पहिला हप्ता जाहीर केल्याने ऊस उत्पादकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

कराळे म्हणाले, घोटणप्रमाणे आंदोलनाला वळण लागले तर त्याला कारखान्याचे संचालक मंडळ व प्रशासन जबादार असेल. साखर आयुक्त व कारखान्याची मिलीभगत असल्याने शेतकरी भरडून निघत आहे. सत्तेच्या दबावात विविध चौकशा थांबवल्या. किरकोळ अपवाद वगळता कारखाना तुमच्या ताब्यात असतांना कोट्यवधींचा कर्जबाजारीपणा कसा आला. कामगारांची मुस्कटदाबी सुरू असून अनेक दिवसांचे पगार नाहीत. सर्वात कमी पगार वृद्धेश्वरच्या कामगारांना आहे. निवडणुका बिनविरोध होतात. बहुसंख्य संचालक एस. टी. ने बैठकीला येतात. मग खर्च कोठे, कोणासाठी व कोणावर होतो? राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

अध्यक्ष शेतकर्‍यांच्या बाजूने

वृद्धेश्वराचा भाव अजून ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचला नाही. शेतकर्‍यांची कामधेनू कोणासाठी कामधेनू ठरत आहे हा संशोधनाचा विषय आहे. संचालक मंडळाची भूमिका ताठर असून कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे मात्र ऊस उत्पादकांच्या बाजूने आहेत. त्यांना बदनाम करण्यासाठी व नवे नेतृत्व पुढे आणण्यासाठी काही  संचालक पडद्या आडून डाव खेळत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.