Sun, May 26, 2019 11:45होमपेज › Ahamadnagar › दूध उत्पादकांना अपघाती विमा

दूध उत्पादकांना अपघाती विमा

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 1:33AMकोपरगाव : प्रतिनिधी

दूध उत्पादक शेतकर्‍यांचे हित जोपासण्याचे काम येथील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाच्यावतीने 35 हजार दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी 21 जून पासून अपघाती विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिली. 

तसेच गायींना माफक दरात व औषधी सेवा मिळावी म्हणून गोदावरी बीएबीटीएल पशुरोग निदान प्रयोगशाळा व पशुवैद्यकीय मेडीकल स्टोअर्सचा शुभारंभ विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत, तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी अडीच वाजता संघाच्या कार्यस्थळावर केला जाणार आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे उपस्थित राहणार आहेत. संघाच्या कार्यक्षेत्रात कोठेही प्रयोगशाळा नाही. दूध उत्पादकांना ही सेवा अल्पदरात उपलब्ध करून देण्याचा संघाचा मानस आहे.  तसेच दूध उत्पादक शेतकरी अपघाती विमा योजना 37 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.

दरवर्षी सहाशे रूपये अपघाती विमा पॉलीसी रक्कम असून विमा धारकाचे अपघाती निधन झाल्यास त्याच्या वारसांना वीस लाख रूपयांची मदत मिळणार आहे. याकरिता एक कोटी ऐंशी लाख रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे.  

संघाच्या वतीने म्हशीचे सॉर्टेड सीमेन सुरू करण्यात येत असून त्यामुळे नव्वद टक्के म्हशींना पारडू व दहा टक्के टोणगे जन्मास येऊ शकतात.  सहाजिकच म्हशींची संख्या वाढून दुग्ध व्यवसायासाठी शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे.  याकरिता संघाने गायींना सॉर्टेड सीमेन सुरू केले होते. त्याचा परिणाम 93 टक्क्यांवर जाऊन कालवडी जन्माला आले तर सात टक्के गोर्‍हे जन्मास आले त्यामुळे संघाचे 1 लाख 80 हजार दूध संकलन होत आहे ते भविष्यात पाच लाख लिटर्स पर्यंत नेले जाणार आहे. याप्रसंगी महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष संजय खांडेकर उपस्थित होते कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी आभार मानले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.