Mon, Aug 19, 2019 17:45होमपेज › Ahamadnagar › जिल्हाभरात मुबलक जलसाठा

जिल्हाभरात मुबलक जलसाठा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होत आहे. पाणलोट क्षेत्रात देखील झालेल्या जोरदार पावसाने मोठे आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाली. आजमितीस धरणांत मोठा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास सहा टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. जलयुक्‍त शिवाराची कामे आणि मुबलक पावसामुळे  भूजलपातळी देखील उत्तम आहे. त्यामुळे मार्च महिना संपत आला, तरीही जिल्ह्यात अद्यापि टँकरची मागणी झाली नाही.

जून ते ऑक्टोबर महिन्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली. तीस-चाळीस वर्षांनंतर जिल्ह्यात प्रथमच पावसाची सर्वांधिक नोंद झाली आहे. या पावसाने जिल्हाभरातील लहान-मोठया नद्या यंदा वाहत्या झाल्या. अद्यापि प्रवरा व गोदावरी नदीत पाणी खेळत आहे. गेल्या दोन वर्षात जलयुक्‍त शिवार अभियानअतंर्गत अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे छोटे-मोठे तलाव, बांध, ताली पावसाने भरले गेले. त्यामुळे चढत्या उन्हाळयात देखील जिल्हाभरातील भूजलपातळी कायम आहे.

पाणलोट क्षेत्रात जोमदार पावसाची नोंद झाली. त्यामुळे भंडारदरा, मुळा व निळवंडे ही मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली. आढळा, सीना, खैरी, विसापूर आदी मध्यम प्रकल्प देखील काठोकाठ भरली गेली होती. गेल्या वर्षी 2016 मध्ये देखील जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी देखील छोटी-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली होती.

सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यास जानेवारीपासूनच जिल्ह्यात  पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. यंदाचा पावसाळा संपून पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. उन्हाची तीव्रता देखील वाढली आहे. एक-दोन दिवसांत एप्रिल महिना लागत आहे. परंतु अद्यापि पाणीटंचाईची ओरड जिल्हाभरातून झाली  नाही.गेल्या वर्षी 28 मार्च 2017  रोजी जिल्ह्यातील मोठया आणि मध्यम प्रकल्पांत 23 हजार 364 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र तब्बल 29 हजार 253 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 5 हजार 889 दशलक्ष घनफूट पाणीसाठा अधिक उपलब्ध आहे.

धरणांतील पाण्याची टक्केवारी (गेल्या वर्षीची)

भंडारदरा 65.44 (61.59), मुळा 57.22 (47.52), निळवंडे  49.88 (35.10), आढळा 43 (29.62), मांडओहळ 47 (38.85), घाटशीळ 12.36 (39.36), सीना 66.46(29.54), खैरी 53.66(56.85), विसापूर 46 (5.66). 

 

Tags : Ahmednagar,  Ahmednagar news, water, storage,


  •