Tue, Sep 25, 2018 12:49



होमपेज › Ahamadnagar › महाराजांच्या सिंहासनासाठी सरकारने निधी दिला तरी घेणार नाही : संभाजी भिडे

महाराजांच्या सिंहासनासाठी सरकारने निधी दिला तरी घेणार नाही : संभाजी भिडे

Published On: Jun 10 2018 1:33PM | Last Updated: Jun 10 2018 1:41PM



अहमदनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्याने मुस्लिमांचा नंगानाच थांबला. अन्यथा  महाराष्ट्रातील जनतेवर देखील अत्याचार झाले असते, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी नगरमध्ये आयोजित सभेत केले. ‘संकल्प सुवर्ण सिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत नगरमधील पटेल मंगल कार्यालयात सभेत ते बोलत होते. याच सभेत भिडेंनी नगरला ‘अंबिकानगर’ असेही संबोधले आहे. 

या सभेला आरपीआय व इतर संघटनांचा विरोध वाढला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंबेडकरी संघटनांनी भिडे गुरुजींच्या सभेला विरोध दर्शवला असून सभेच्या ठिकाणी आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा काढला आहे. त्यांच्याकडून भिडे गुरुजींविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. सभेत भिडे गुरुजी यांच्या सभेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीस ते चाळीस कार्यकत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सभेमध्ये बोलताना भिडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या  सिंहासनासाठी प्रत्येक तालुक्यात दोन हजार धारकरींनी निधी गोळा करायचा आहे. सरकारकडे यासाठी निधी मागणार नाही. एवढेच नाही तर त्यांनी निधी दिली तरी आपण तो घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्याने मुस्लिमांचा नंगानाच थांबला, नाहीतर महाराष्ट्रातील जनतेवर देखील अत्याचार झाले असते. मुस्लिमांनी देशातील सर्व मंदिरे उध्वस्त केली. महाराष्ट्रातील मंदीरे वाचली आहेत ती फक्त शिवाजी महाराजांमुळे हे आपण लक्षात ठेवायला हवे, असेही ते म्हणाले.  

रायगडावर खडा पहारा देण्यासाठी दररोज दोन हजार धारकरी रायगडावर जाण्यास तयार आहेत. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे १ हजार २८४ किलोचे सिंहासन उभारणार आहोत, येत्या सव्वा वर्षात सिंहासनाचे काम पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.