होमपेज › Ahamadnagar › शिक्षकांची एक पगारवाढ रोखणार!

शिक्षकांची एक पगारवाढ रोखणार!

Published On: Jun 30 2018 1:14AM | Last Updated: Jun 30 2018 12:02AMनगर : प्रतिनिधी

ऑनलाईन बदल्यामध्ये संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये बदलीसाठी पात्र ठरण्यासाठी ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरून बदली करून घेतली त्या शिक्षकांवर अपात्रतेसह एक पगारवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी दिली.

नुकत्याच आलेल्या शासन निर्णयानुसार बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे अधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. या शासन निर्णयानुसार संबंधित शिक्षकाची एक पगारवाढ रोखण्यात येईल. त्यानंतर त्या शिक्षकांची बदली रद्द होईल. बदली रद्द झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर पूर्वी जो शिक्षक असेल त्याची नेमणूक करण्यात येणार आहे. शिल्लक राहिलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांवर चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात येणार आहे.

संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये बदलीसाठी काही शिक्षकांनी बनावट आणि चुकीचे कागदपत्रे सादर करत बदलीचा लाभ घेतलेला आहे. अशा शिक्षकांच्या कागदपत्रांची सध्या तालुका पातळीवर पडताळणी करण्यात आली. गटशिक्षणाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्यामार्फत ही पडताळणी झाली. त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या संवर्गात पती-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ घेण्यासाठी दोन शिक्षकांच्या शाळांमधील अंतर हे 30 किलो मीटरपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. मात्र, काही शिक्षकांनी एसटी महामंडळाकडून प्रत्यक्षात आंतर कमी असताना एक किंवा दोन किलोमीटर अंतर वाढवून घेत बदलीचा लाभ घेतला आहे. अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे बदलीचा लाभ घेतलेल्यामध्ये बर्‍याच शिक्षकांनी जुने अपंग प्रमाणपत्र सादर केलेले आहेत. नवीन नियमानुसार अपंग व्यक्तींना आता त्यांच्या प्रमाणपत्राची ऑनलाईन नोंदणी करून दरवर्षी पडताळणी करणे आवश्यक आहे. तीही अनेकांनीं केलेली नसल्याचे समोर आले आहे.

बदलीचा लाभ घेतलेल्या अनेक शिक्षकांकडे पडताळणी केलेले प्रमाणपत्र नाही. यामुळे हे प्रमाणपत्र बोगस असण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात बदलून आलेल्या काही शिक्षकांनी या बदलीत नियमबाह्य पध्दतीने बदलीचा लाभ मिळविलेला आहे. काही शिक्षकांकडे घटस्फोटाचे प्रमाणपत्र नसतांना बदलीचा लाभ घेतलेला आहे.