Thu, Jul 18, 2019 15:22होमपेज › Ahamadnagar › मनसेतील वाद चव्हाट्यावर!

मनसेतील वाद चव्हाट्यावर!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद काल बाळा नांदगावकर यांच्यासमोरच चव्हाट्यावर आले. असे असतानाही शहराध्यक्षपदी वाहतूक सेनेचे माजी अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांची अनपेक्षित निवड जाहीर करुन  नांदगावकर यांनी मनसेचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का दिला. पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी समन्वयातून काम करावे, येत्या 8 दिवसांत कार्यकारिणीची नावे पाठवावीत, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, राशिनकर यांच्या निवडीनंतर माजी शहराध्यक्ष गिरीश जाधव, नितीन भुतारे समर्थकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा आगामी दौरा व त्यादृष्टीने पक्ष बांधणीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काल (दि.30) नगर येथे आढावा बैठक घेतली. बैठकीत कार्यकर्ते नगरसेवकांची मते जाणून घेत असतांनाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरसेवकांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. नगरसेवकांनीही यावेळी मत व्यक्‍त करतांना कार्यकर्त्यांना नांदगावकर यांच्यासमोर चांगलेच फटकारले. आम्ही सहा महिन्यांत पक्ष वाढवून दाखवू, असे कुणी म्हणत असेल, तर हे होऊच शकत नाही. झाले तर मी पक्षाचा राजीनामा देईल. कुणीही उठतयं आंदोलन करतयं. चार-पाच जणांच्या आंदोलनाने काहीही साध्य होत नाही.

सध्या शहरात पक्षाची अत्यंत वाईट अवस्था आहे. एकत्र येवून जबाबदारीने काम केले तर आगामी मनपा निवडणुकीत काहीतरी साध्य करता येईल, अशा शब्दांत नगरसेवक गणेश भोसले यांनी सुनावले. दत्ता जाधव यांनीही पक्षाचे कार्यक्रम, आंदोलनावेळी सर्वांना निरोप दिले जातात, मात्र, कुणीच फिरकत नाही, स्वतःचे पाप झाकण्यासाठी नगरसेवकांवर टीका करु नका, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलनावेळी बोलावत नाहीत. माहितीही देत नाहीत. बातम्या आल्यावरच आंदोलन झाल्याचे कळते, असा टोला श्रीनिवास बोज्जा यांनी लगावला.

कार्यकर्त्यांनी व्यथा मांडतांना पक्षावरही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली. वरिष्ठ पातळीवरुन कुणीही नगरकडे लक्ष देत नाहीत. कुणी आलेच तर आमच्यातच भांडणे लावण्याचे काम करतात. गेल्या अडीच वर्षांपासून कार्यकारिणी बरखास्त आहे. पाच वेळा मुंबईत चकरा मारुनही याकडे कुणी लक्ष दिले नाही. नगरसेवक आम्हाला विचारात घेत नाहीत, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या. नांदगावकर यांच्या समोरच अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांनी पदाधिकार्‍यांसह नगरसेवक, कार्यकर्त्यांनाही सुनावले.

ते म्हणाले की, पक्षात जे जुने निष्ठावान आहेत, त्यांच्यावर पक्ष जबाबदार्‍या सोपविणारच आहे. मात्र, नवेही पक्षाला हवेच आहेत. आगामी काळात सर्वांनी समन्वयातून काम करावे. जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांनी शहरात ढवळाढवळ करु नये. कार्यकारिण्या लवकरच निवडल्या जातील. गिरीष जाधव, परेश पुरोहित, सुमित वर्मा, नितीन भुतारे, गजेंद्र राशिनकर यांनी यावेळी शहराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्‍त केली. नांदगावकर यांनी येत्या 8 दिवसांत नावे सादर करण्याच्या सूचना जिल्हा संघटक सचिन डफळ यांना दिल्या. मात्र, बैठक आटोपती घेत असतांनाच त्यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी राशिनकर यांच्यावर सोपवत असल्याची घोषणा करुन इच्छुकांना चांगलाच धक्का दिला. नांदगावकर यांनी अनपेक्षितपणे केलेल्या या घोषणेमुळे खुद्द राशिनकर यांनाही धक्का बसला. मात्र, गिरीष जाधव, नितीन भुतारे आदींसह काहींनी मात्र या निवडीवर नाराजी व्यक्‍त केली आहे.

दोन दिवसांत निर्णय घेणार : भुतारे

शहराध्यक्षपदी गजेंद्र राशिनकर यांना संधी दिल्यानंतर नितीन भुतारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्‍त केली आहे. ज्यांचे शहरातील पक्ष कार्यात योगदान नाही, अशांना संधी दिली जात आहे. पक्षाची वाईट अवस्था असतांनाही आम्ही पक्ष जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. इच्छुकांशी चर्चा करुन सर्वसहमतीने निर्णय अपेक्षित होता. मात्र, अशा पद्धतीने काम करणार्‍यांना डावलले जात असेल तर, पक्षासाठी तेे घातकच आहे. वरिष्ठ पातळीवर जे घडले तेच आज नगरमध्येही घडले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या निवडीवर चर्चा करुन आम्ही निर्णय घेणार असल्याचे नितीन भुतारे यांनी ‘पुढारी’शी’ बोलतांना सांगितले.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, MNS, Bala Nandgaonkar, meeting,


  •