Thu, Apr 25, 2019 07:46होमपेज › Ahamadnagar › भाजपकडून सेनेच्या पाठीत खंजीर!

भाजपकडून सेनेच्या पाठीत खंजीर!

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:38PMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

शिवसेनेचे बोट धरून वाढलेल्या भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले असल्याने भाजप मुक्त राज्य करण्यासाठी आता शिवसैनिकांनी अधिक जोमाने कामास लागावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय घाडी यांनी केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून येथील गोरे मंगल कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, घनशाम शेलार,विजय पाटील, शिवाजी मचे, उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, तालुका प्रमुख रफिक शेख, अविनाश मगरे, बाबासाहेब ढाकणे, भगवान दराडे, नवनाथ चव्हाण, शहरप्रमुख भाऊसाहेब धस आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

घाडी म्हणाले की, आजची भाजप पाहून स्व. मुंडे यांना स्वर्गात सुद्धा वाईट वाटत असून, सोन्यासारखी असलेली मुंडे व सेनाप्रमुख सारखी माणसे आज ह्यात नसल्याने भाजपला मस्ती चढली आहे. जय जवान जय किसान असा नारा आपण देतो मात्र आज जवान व किसान दोघेही मरत असताना नरेंद्र मोदी हे गुपचूप पाकमध्ये जाऊन नवाज शरीफ यांना भेटतात. शिवसेनेने केलेल्या मागणीमुळेच शेतकर्‍यांना कर्ज माफी देण्याचे भाजपला मान्य करावे लागत असल्याने शेतकर्‍यांना कर्ज माफी मिळाली मात्र ती पुरेशी देण्यात भाजपने हात आखडता घेतला. ही  आपली अखेरची लढाई असून मागील वेळेस मोदी यांच्या थापांवर आपण विश्वास ठेऊन मते दिली मात्र उद्धव ठाकरे हे जे बोलतात ते करून दाखवत असल्याने आता सेनेच्या मागे खंबीर उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.