नगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य काल मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत पाच जिल्ह्यांत एकूण 92.30 टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक 95.08 टक्के मतदारांनी हक्क बजावला. तर नगर जिल्ह्यात 92.14, नाशिक जिल्ह्यात 91.80, जळगाव जिल्ह्यात 91.89 व धुळे जिल्ह्यात 92.27 टक्के मतदान झाले. 28 जून रोजी नाशिक येथे मतमोजणी होणार आहे.
नगर जिल्ह्यातील 12 हजार 383 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. जिल्हाभरात कोणताही गोंधळ वा गडबड न होता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल (दि.25) जिल्ह्यातील 20 केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा तुरळक दिसत होत्या. या कालावधीत फक्त 16 टक्के मतदान नोंदविले गेले होते. त्यानंतर मात्र मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढू लागली. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 13 हजार 439 मतदारांपैकी 8 हजार 151 मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांच्या तुलनेत 60.65 टक्के मतदान झाले. दुपारी तीननंतर मात्र मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली. शेवटच्या दोन तासांत 4 हजार 232 मतदारांनी मतदान केले आहे.
मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक सूक्ष्म निरीक्षक, एक शिपाई व एक हत्यारी पोलिस तसेच एक व्हिडिओ कॅमेरामन यांची नियुक्ती केली होती. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्राच्या दोनशे मीटर अंतरावर एक फौजदार व पाच पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला गेला होता. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात आले. निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांनी अकोले व संगमनेर तालुक्यातील मतदान केंद्राला भेट दिली. तेथील मतदान प्रक्रिया कशी चालली याची माहिती घेतली. नगर येथील रेसिडेन्शीअल हायस्कूल येथील मतदान केंद्राला जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी भेट देवून मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी तहसीलदार सुधीर पाटील, आप्पासाहेब शिंदे यावेळी उपस्थित होते.