Tue, Jul 16, 2019 22:43होमपेज › Ahamadnagar › कर्जतला ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के  मतदान

कर्जतला ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के  मतदान

Published On: May 28 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 11:02PMकर्जत : प्रतिनिधी 

कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी काल (दि.27) सरासरी 90 टक्के मतदान झाले. सर्वांत जास्त म्हणजे 94.35 टक्के मतदान करमनवाडी येथे, तर सर्वांत कमी 87.60 टक्के मतदान खेड येथे झाले. मतमोजणी कर्जत तहसील कार्यालयात आज (दि. 28) सकाळी 9 वाजता  होणार आहे.

कर्जत तालुक्यातील खेड, गणेशवाडी, औटेवाडी, करमनवाडी, वायसेवाडी या पाच ग्रामपंचायतींची व खंडाळा व चापडगाव या ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीसाठी काल शांततेने मतदान झाले. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाली. मात्र अपवाद वगळता शांततेने मतदान झाले. 

काल झालेल्या मतदानासाठी तालुक्यात 18 मतदान केंद्र होते. यासाठी 108 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस दिसून आली. यामुळे मतदान केंद्राच्या परीसरामध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते साडेपाच अशी होती. तीव्र उन्हाळा असल्याने मतदार सकाळी मतदान केंद्रावर आले होत. प्रत्येक मताचे महत्त्व ओळखून उमेदवारांचे समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ करत होते.  

मतदानाच्या आदल्या रात्री पाचही ग्रामपंचायतींमध्ये युवक रस्त्यावर विरोधक पैसे वाटत आहेत का, हे पाहण्यासाठी खडा पहारा देत होते. तरीही जनतेमधून सरंपच निवड होत असल्याने होऊ देे खर्च हे सूत्र सर्वत्र दिसून आले. या निवडणुकीत एकूण 39 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जनतेमधून सरंपच निवड होणार असल्याने सर्वच ग्रामपंचायतीमध्ये मोठी चुरस दिसून आली.

ग्रामपंचायत निहाय जागा व निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार असे : खेड ग्रामपंचायत 11 जागांसाठी 22 उमेदवार, तसेच येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होणार आहे. गणेशवाडी ग्रामपंचायत 9 जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होणार आहे. औटेवाडी ग्रामपंचायतीच्या 7 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित 4 जागांसाठी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होणार आहे. करमनवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित 5 जागांसाठी 10 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होणार आहे. वायसेवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागांपैकी 1 जागा बिनविरोध झाली. उर्वरित 6 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होणार आहे. खंडाळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, चापडगाव एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. 

मतदानाची टक्केवारी अशी (मतदार व झालेले मतदान) : खेड- 2 हजार 711 पैकी 2 हजार 375 मतदारांनी मतदान झाले. 87.60 टक्के मतदान झाले.गणेशवाडीत 1 हजार 968 पैकी 1 हजार 802 मतदारांनी मतदान केले. 91.63 टक्के मतदान झाले. औटेवाडीत 798 मतदारांपैकी 726 जणांनी मतदान केले. 90.97 टक्के मतदान झाले. करमणवाडीत 1 हजार 63 पैकी 1 हजार 3 मतदारांनी मतदान केले. 94.35 टक्के मतदान झाले. वायसेवाडीत 1 हजार 24 पैकी 964 मतदारांनी मतदान केले. 94.14 टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीमध्ये खंडाळा येथे 92.60 टक्के व चापडगाव येथे 68 टक्के मतदान झाले.