होमपेज › Ahamadnagar › हल्ला प्रकरणातील ९ आरोपी शरण

हल्ला प्रकरणातील ९ आरोपी शरण

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 07 2018 11:47PMसंगमनेर : प्रतिनिधी

शहरातील गणेशनगरमधील हल्ला प्रकरणी गेल्या दीड महिन्यांपासून पसार असलेल्या नऊ आरोपींनी अखेर शहर पोलिसांसमोर शरणागती पत्करली. संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दाखल प्रकरणातील बारा आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर त्यातील नऊ जणांनी समर्पण केले तर तीन आरोपी अद्यापि पसार आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

20 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शुभम उर्फ लाल्या गोरख रहाणे याने आपल्या साथीदारांसह गणेशनगरमध्ये धुडगूस घालत एकाला मारहाण केली होती. याप्रकरणी कार्तिक बाबुराव जाधव याने त्याच दिवशी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. मात्र घटनेनंतर आरोपी पसार झाले होते.

या दरम्यान त्यांनी संगमनेरच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, तो फेटाळण्यात आला. त्यानंतर  शुभम उर्फ लाल्या गोरख रहाणे (वय 23 रा. रहाणे मळा), गणेश दिगंबर बेलापूरकर (वय 21 रा. इंदिरानगर), साईनाथ अजय शिंदे (वय 19 रा.शिवाजीनगर), ऋषीकेश जालिंदर गिरी (वय 19 रा.इंदिरानगर), लखन मारुती शिंदे (वय 20 रा.शिवाजीनगर), सुरज दादु जगताप (वय 24 रा.कणोली, ता.संगमनेर), अभिजीत गोरख रहाणे (वय 21, रहाणे मळा), अनिल बबन गायकवाड (वय 25, शिवाजीनगर) व विकास लक्ष्मण आव्हाड (वय 23, वाघापूर) आदींनी पोलिसांसमोर समर्पण केले.