Sat, Jul 20, 2019 11:19होमपेज › Ahamadnagar › ८४० घरकुलांचा ‘डीपीआर’ मंजूर !

८४० घरकुलांचा ‘डीपीआर’ मंजूर !

Published On: Apr 18 2018 1:43AM | Last Updated: Apr 18 2018 12:17AMनगर : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केडगाव व नालेगाव येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या महापालिकेच्या 840 घरकुलांच्या प्रकल्प अहवालास राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 65.79 कोटींचा खर्च असलेला प्रस्ताव राज्याच्या मुख्य सचिवांनी मंजूर केल्यानंतर काल (दि.17) हा अहवाल केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी सरकारने सादर केला आहे. या रखडलेल्या प्रस्तावाबाबत महापौर सुरेखा कदम यांनी काही दिवसांपूर्वीच नगरविकास विभाग व म्हाडाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

सर्वांसाठी घरे या उद्देशाने केंद्र सरकारमार्फत घरकूल योजना राबविली जात आहे. यात भागीदारी तत्वावर परवडणारी घरे, वैयक्‍तिक मालकीच्या जागांवर घरकूल उभारणी व झोपडपट्टी पुनर्वसन अशा तीन घटकांचा समावेश आहे. 2022 पर्यंत मनपाला 16 हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी मनपाकडे तब्बल 16 हजार अर्ज दाखल झाले होते. 12 हजार अर्ज छाननीनंतर केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यातील भागीदारी तत्वावर परवडणार्‍या घरांसाठी मनपाकडे 8900 अर्ज दाखल झाले होते. मनपाने केडगाव व नालेगाव येथे घरकूल उभारणीसाठी प्रकल्प अहवाल तयार करुन तो जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत म्हाडा व राज्यस्तरीय समितीकडे सादर केला होता.

म्हाडाच्या तपासणीनंतर मनपाच्या दोनही अहवालाला समितीने मंजुरी दिली आहे. केडगाव येथे 624 घरकुलांचा प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी 46.32 कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तर नालेगाव येथे 216 घरकुले बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 19.47 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मागील महिनाभरात झालेल्या तपासणीनंतर मनपाने सर्व त्रुटींची पूर्तता केली होती. मात्र, राज्यस्तरीय समितीकडे हे प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी प्रलंबित होते. काही दिवसांपूर्वीच महापौर कदम यांनी यासाठी शासन दरबारी चर्चा करुन पाठपुरावा केला होता. त्यानंतर 13 एप्रिल रोजीच्या समितीच्या बैठकीत दोनही प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आले. काल सायंकाळी उर्वरीत कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर हे दोन्ही अहवाल केंद्र शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन घटकांतर्गत संजयनगर येथील घरकूल प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यातचे काम मनपाकडून सुरु आहे. तर वैयक्‍तिक जागेवर घरकुल उभारण्यासाठीच्या योजनेअंतर्गत मनपाकडे 2400 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 250 घरकुलांबाबतचा पहिल्या टप्प्यातील ‘डीपीआर’ही येत्या काही दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

खासगी विकसकांकडून प्रस्ताव मागविणार!

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खासगी विकसकांनाही शासनाने सामावून घेतले आहे. एका सदनिकेसाठी लाभार्थ्याला अडीच लाखाचे अनुदान मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी अडीच एफएसआयही शासनाकडून दिला जाणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार लवकरच मनपाकडून अधिकृत सूचना जारी होऊन या संबंधीचे प्रस्ताव मागविले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

Tags : ahamadnagar, ahamadnagar news, house, DPR approved,