Mon, Apr 22, 2019 23:54होमपेज › Ahamadnagar › ग्रामपंचायतींसाठी ८२% मतदान

ग्रामपंचायतींसाठी ८२% मतदान

Published On: May 28 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 11:21PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 81.62 टक्के मतदान झाले आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता त्या-त्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. आगामी पाच वर्षांसाठी कोण गावकारभारी होणार, याची मात्र सर्वत्र उत्सुकता ताणली गेली आहे. 

माहे जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 75  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात जाहीर केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे बारागाव नांदूर, वडगाव गुप्‍ता, चितळी, लोणी व्यंकनाथ, कान्हूरपठार,  मुकिंदपूर,  देसवंडी आदींसह  70 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडीसाठी काल (दि.27) मतदान झाले. या सर्व ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने 241 मतदान केंद्र निश्‍चित केली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असे एकूण पाच कर्मचारी नियुक्‍तीस होते.

सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. 70 ग्रामपंचायतींसाठी एकूण 1,24,654 मतदारांपैकी 1,1,738 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. अकोले तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींसाठी 72 टक्के, संगमनेर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी 92.18 टक्के, कोपरगाव तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींसाठी 80.77 टक्के मतदान झाले. राहाता तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी 83.73 टक्के, राहुरी तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी 78.84 टक्के, नेवासा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 64.68 टक्के, नगर तालुक्यातील एका ग्रामपंचायतींसाठी 90 टक्के, पारनेर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 86.80 टक्के, पाथर्डी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी 89.73 टक्के, शेवगाव तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी 84.40 टक्के, कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 90.82 टक्के, जामखेड व श्रीगोंदा तालुक्यांतील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीसाठी अनुक्रमे 90.50 व 84.63 टक्के मतदान झाले.