Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Ahamadnagar › थकित वीज बिलातील ८० कोटी माफ!

थकित वीज बिलातील ८० कोटी माफ!

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:24PMनगर : प्रतिनिधी

महापालिका पाणी योजनेच्या वर्षानुवर्षे थकीत असलेल्या 169.63 कोटींच्या वीजबिलातील 80.24 कोटींचे दंड व व्याज माफ करण्याचा मूळ मुद्दलातील 50 टक्के रक्कम (44.69 कोटी) 10 समान हप्त्यात जमा करण्याचा प्रस्ताव ‘महावितरण’ने महापालिका प्रशासनाला दिला आहे. दंड व व्याजात 100 टक्के सवलत मिळविण्यासाठी मात्र, मनपाला दरमहा 4.46 कोटींचा हप्ता न चुकता भरावा लागणार असल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहर पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाची चालू बिलांसह 169 कोटी 63 लाख 38 हजार 310 रुपयांची थकबाकी आहे. त्यात 80 कोटी 24 लाख 69 हजार 608 रुपयांच्या दंड व व्याजाचा समावेश असून 89 कोटी 38 लाख 68 हजार 702 रुपये थकबाकीची मूळ मुद्दल आहे. राज्य शासनाने 16 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या वीजबिलाच्या थकबाकीतील मुद्दलाची 50 टक्के रक्कम 14 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून उपलब्ध होणार्‍या निधीतून ‘महावितरण’ला अदा केली जाणार आहे. तर उर्वरीत 50 टक्के रक्कम महापालिकेलाच भरावी लागणार असून त्यासाठी समान हप्ते करुन देण्याचे निर्देश उर्जा विभागाने महावितरण कंपनीला दिले होते. त्यानुसार महावितरणकडून महापालिकेला प्रस्ताव सादर झाला आहे.

89.38 कोटींच्या मूळ मुद्दलापैकी 44.69 कोटी रुपये 14 व्या वित्त आयोगातून अदा केले जाणार आहेत. तर उर्वरीत 44.69 कोटी रुपये जून 2018 ते मार्च 2019 या 10 महिन्यांत दरमहा 4.46 कोटी या प्रमाणे महापालिकेला अदा करावे लागणार आहे. मनपाने नियमित हप्ते अदा केल्यास थकबाकीवरील 80.24 कोटींचे दंड व व्याज माफ होणार आहे. मात्र, मनपाने हप्ते न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करुन कारवाई केली जाईल, असे ‘महावितरण’ने म्हटले आहे. ‘महावितरण’ने दिलेल्या प्रस्तावावर मनपाने संमतीचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मनपाची आर्थिक स्थिती पाहता 4.46 कोटी रुपये दरमहा अदा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे हप्त्यांचा कालावधी वाढवून रक्कम कमी करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. मनपाने नियमित हप्ते फेडल्यास वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला थकबाकीचा विषय कायमचा मार्गी लागणार आहे.