Sat, Nov 17, 2018 08:34



होमपेज › Ahamadnagar › बस-जीपच्या अपघातात ८ ठार

बस-जीपच्या अपघातात ८ ठार

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 23 2018 11:38PM



चांदवड : वार्ताहर

चांदवड तालुक्यातील खडकजांब गावाच्या शिवारातील चिकूच्या बागेसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर क्रुझर जीप व बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा महिला, अकरा वर्षांची चिमुकली तसेच जीपचालकासह आठ जण ठार झाले. तर नऊ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चांदवड, पिंपळगाव बसवंत, नाशिक येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात झाल्यानंतर बसच्या पाठीमागे असलेल्या इर्टिका व इनोव्हा या दोन्ही गाड्या बसवर जाऊन आदळल्या.

बागलाण (सटाणा) तालुक्यातील किकवारी खुर्द येथील कैलास महादू जगताप यांच्या मुलीचे लग्‍न शनिवारी (दि.23) दुपारी असल्याने त्यांच्या घरचे, नातेवाईक हे सिल्व्हर रंगाची क्रुझर जीप (क्र. एमएच 15, ईबी 3619) मध्ये बसून चांदवड तालुक्यातील सोग्रसमार्गे मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात होते. चांदवड तालुक्यातील खडकजांब गावच्या शिवारातील चिकूच्या बागेसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर सकाळी 11 च्या सुमारास क्रुझर जीपच्या पाठीमागचे टायर फुटल्याने गाडी महामार्गाच्या मध्यभागी असलेले दुभाजक ओलांडून सटाणा आगाराची नाशिककडून नंदुरबारला जाणार्‍या बसला (क्र. एमएच 14, बीटी 4716) जाऊन धडकली. हा अपघात झाल्यावर बसच्या पाठीमागून येणारी इर्टिका गाडी (क्र. एमएच 19, बीजे 7020) व तिच्या मागे असलेली इनोव्हा (क्र. एमएच 01, एएल 8233) बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातात क्रुझर जीपचा पूर्ण चेंदामेंदा होऊन जीपचालकासह पाच असे एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

तर जीपमधील 11 जण गंभीर जखमी झाले होते. अपघात झाल्याची माहिती मिळताच वडाळीभोई पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार कल्याणराव जाधव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताची भीषणता ओळखत ताबडतोब पिंपळगाव बसवंत येथे फोन लावून रुग्णवाहिका मागवून घेतल्या. हवालदार जाधव यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे हलविले. जखमींवर धन्वंतरी व राधाकिसन या दोन खासगी दवाखान्यांत उपचार सुरू करण्यात आले. अपघातातील मोहिनी विनायक मोरे (50, मुंजवाड), मुलगी सिद्धी विनायक मोरे (11) व शोभा संतोष पगारे (40, रा. मुंजवाड) या तिघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच अकरावर्षीय सिद्धी मोरे व शोभा पगारे या दोघींचा मृत्यू झाला. तर मोहिनी मोरे यांना नाशिक येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

यावेळी चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, वडनेर भैरवचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पिंपळगावचे सहायक पोलीस बिपीन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील, अभिजित जाधव हे घटनास्थळी उपस्थित होते. मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांनी पिंपळगाव बसवंत येथे पोहचून एकच आक्रोश केल्याने संपूर्ण परिसर हळहळला होता.