Wed, Jul 17, 2019 12:01होमपेज › Ahamadnagar › 76 गावांत नाही मोबाईलला रेंज!

76 गावांत नाही मोबाईलला रेंज!

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 10:48PMनगर : प्रतिनिधी

देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असतांना, नगर जिल्ह्यातील ग्रामीण भाग अजूनही त्यापासून दूर आहे. जिल्ह्यातल्या 76 गावांमध्ये स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही मोबाईलला रेंज मिळत नसल्याचे वास्तव आहे. सरकारी कार्यालये पेपरलेस करण्याचा प्रयत्न चाललेला असतांना या गावांमध्ये सरकारी कामांचाही रेंज अभावी खोळंबा होत असून, या गावांत मोबाईलला रेंज कधी मिळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरात डिजिटल इंडियाचा प्रयोग सुरु करण्यात आला. त्यानुसार सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना त्यात डिजिटल साधनांचा वापर वाढला. स्वस्त धान्यापासून ते रॉकेल, खते, गॅस यांचे अनुदान थेट बँकेत संबंधितांच्या खात्यावर जमा होते. त्याची माहिती मोबाईलव्दारे संबंधितांना मिळत आहे. ग्रामपंचायती, तलाठी ऑफीस, कृषी खाते, बांधकाम खाते यांचे कामही ऑनलाईन झाले असून बांधकामाच्या सद्यस्थितीचा मोबाईलव्दारे फोटो काढून तो ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे. घरकुल योजना आणि शौचालय योजनेची प्रगती ऑनलाईन पाहून त्याचे टप्प्या-टप्प्याने हप्ते लाभधारकांना देण्यात येत आहेत.

ग्रामपंचायतीचे जन्म-मृत्यू, विविध दाखले, कर भरण्याची सद्य स्थिती, ऑनलाईन सात-बारा निघत असताना नगर जिल्ह्यात 1 हजार 311 ग्रामपंचायतींपैकी 76 ग्रामपंचायती माहिती तंत्रज्ञानाच्या महाजालापासून अद्यापही दूर आहेत. या गावांमध्ये एकाही मोबाईल कंपनीची मोबाईल कनेक्टीव्हीटी पोहचलेली नाही. यामुळे ग्रामपंचायतींचे ऑनलाईन कामे ही एकतर शेजाराच्या गावातून अथवा तालुक्याच्या ठिकाणी करण्याची वेळ शासकीय यंत्रणेवर येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कनेक्टीव्हीटीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असून खर्च करण्यात येणारा निधी जातो कुठे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यातील अकोले सारख्या दुर्गम आदिवासी भागातील तब्बल 25 गावे कनेक्टीव्हीटीपासून दूर आहेत. याठिकाणी प्राधान्याने सरकारने कनेक्टीव्हीटी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नगर शहरालगत असणार्या नगर तालुक्यातील गावांतही कनेक्टीव्हीटी नाही. त्यामुळे या गावांमध्ये तातडीने मोबाईलला रेंज मिळण्याची सुविधा उपलब्द्ध करून देण्याची मागणी होत आहे.

तालुकानिहाय रेंज नसलेली गावे

अकोले 25, जामखेड 8, कर्जत 6, नगर 3, नेवासा आणि पारनेर प्रत्येकी 4, पाथर्डी 6, राहुरी 4, संगमनेर 5, शेवगाव 4, श्रीगोंदा 7 अशा 76 गावांमध्ये रेंज नाही. तर जिल्ह्यात कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता या तालुक्यातील सर्व गावांत मोबाईलची रेंज उपलब्ध झालेली आहे. अन्य तालुक्यांत 3 ते 8 गावे आजही कनेक्टीव्हीटीपासून लांब आहेत.