Sun, Feb 23, 2020 10:02होमपेज › Ahamadnagar › माध्यमिक शिक्षक सोसायटी; विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधार्‍यांची उडाली त्रेधातिरपीट

माध्यमिक शिक्षक सोसायटी; विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधार्‍यांची उडाली त्रेधातिरपीट

Published On: Jul 02 2018 1:41AM | Last Updated: Jul 01 2018 11:15PMनगर : प्रतिनिधी

शेवगाव व पाथर्डी येथील शाखांच्या बांधकामात चुकीच्या प्रकारे खर्च करण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केल्यानंतर सत्ताधारी व विरोधी सभासद आमने-सामने आले होते. सभेत गोंधळ सुरु होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या पाच मिनीटातच सर्व विषयांना मंजूरी देत सभा गुंडाळण्यात आली.

माध्यमिक शिक्षक सोसायटीची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (दि. 1) अध्यक्ष किशोर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुपारी 1 वाजता सभेला सुरूवात झाली. सचिव सोन्याबापू सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्यानंतर सभासद नंदकुमार तोडमल यांनी मयत सभासदांच्या निधीचा विषय उपस्थित केला. मयत निधीत 71 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. सोसायटीकडून याप्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत उपनिबंधक कार्यालयातील कर्मचार्‍यांना सत्ताधार्‍यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

त्यावर संचालक कचरे यांनी उपनिबंधक कार्यालयाने या प्रकरणात सोसायटीला ‘क्लिन चिट’ दिलेली आहे. तोडमल यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. सोसायटीत एका वर्षात बिगर सभासदांच्या 71 लाखांच्या ठेवी वाढल्याचे त्यांनी सांगितले. संचालक आप्पा शिंदे यांनी अहवालात चुका ही निंदनीय बाब आहे. 52 लाखांऐवजी 20 लाख रुपये फी घेणारा ऑडिटर नेमा. ऑडिटर नेमण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला आहे. सभासदांनी याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी केली.

सुनील दानवे यांच्या आरोपांमुळे सभेत गोंधळ होण्यास सुरुवात झाली. शेवगाव-पाथर्डी येथील शाखांच्या बांधकामावर झालेला खर्च चुकीचा असून, उपनिबंधकांनी या कामाला परवानगी नाकारालेली असतांना हे काम कसे केले असा सवाल उपस्थित केला. या कामावर अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्च झालेला असल्याने तुम्ही आमचे अभिनंदन करा, अशा शब्दात कचरे यांनी दानवेंना उत्तर दिले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली.

दोघेही स्वतःचे मुद्दे रेटून नेत असल्याचे पाहून दोन्ही गटातील शिक्षक कार्यकर्ते आक्रमक झाले. दानवे यांना आता भाषण आवरते घ्या, असे म्हणत व्यासपिठासमोर गोंधळाला सुरुवात झाली. विरोधकांनी दानवे यांना बोलूू द्या, अशी मागणी केली. यामुळे दोन्ही गटाच्या शिक्षकांनी दहा मिनीटे एकमेकांना धक्का- बुक्की केली. शिक्षक एकमेकांवर धावून गेल्याने अडीच तास शांततेत सुरु  असणार्‍या सभेचे वातावरण बिघडले. गोंधल होत असल्याचे लक्षात आल्याने अवघ्या पाच मिनीटात सत्ताधार्‍यांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा आटोपती घेतली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष उरले नावालाच

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांच्या वतीने प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी एकट्याने विरोधकांचा मारा थोपविला. विरोधकांच्या सर्व प्रश्‍नांना कचरे एकटेच पुरून उरले. विरोधक संतोष ठाणगे यांनी सत्ताधार्‍यांवर आरोप केले. चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना आकडे कळत नाहीत का? ते फक्त नावालाच उरले आहेत. बाकीच्यांनीही आरोपांना उत्तर देण्याची मागणी केली.