Fri, Jul 19, 2019 17:58होमपेज › Ahamadnagar › 75 टक्के भूसंपादन पूर्ण करा

75 टक्के भूसंपादन पूर्ण करा

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 11:28PM

बुकमार्क करा
 

कोपरगाव : प्रतिनिधी

राज्यातील 10 जिल्ह्यातून जाणार्‍या नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाच्या कामासाठी जानेवारीअखेर 75 टक्के भूसंपादन पूर्ण करावे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले. यावेळी विभागीय आयुक्‍त महेश झगडे जिल्हाधिकारी, राधाकृष्णन उपस्थित होते. यावेळी कोपरगाव तालुक्यातील काही शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली. राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेशाम मोपेलवार यांनी नाशिक येथे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासंदर्भात नुकतीच बैठक घेतली. त्याप्रसंगी मुख्य सचिवांनी हे आदेश दिले आहे. 

नाशिक जिल्ह्यातून 101 किलोमीटरचा मार्ग जात आहे. त्यासाठी 1185 हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. आतापर्यंत 37 टक्के जमीन संपादित झाली आहे.  समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीचा जादा मोबदला मिळावा, म्हणून काही शेतकर्‍यांनी रातोरात बागा, किंमती झाडांची शेती, पोल्ट्रीशेड उभे केले. त्याबाबत आता गुगल मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करून अशा शेतकर्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही उपाध्यक्ष राधेश्याम मोपेलवार यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील 3 गावांत अद्यापि या महामार्गासाठी जमीन मोजणी झाली नाही. त्याच्या अडचणी समजावून घेऊन मार्ग काढू, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा-शिवसेना सरकारचा स्वप्नवत प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील 10 गावांतील 796 एकर क्षेत्र संपादित केले जाणार असून त्यासाठी 197 एकर क्षेत्र संपादित करून 233 शेतकर्‍यांच्या खात्यावर 89 कोटी 93 लाख 59 हजार 64 रुपये जमा केले आहेत. आणखी 599 एकर जमीन क्षेत्र संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कामाला सध्या वेग आला असून, रात्री-अपरात्री वरिष्ठ अधिकारी जमीन खरेदीचे व्यवहार करीत आहेत.  शेतकरीही आता स्वत:हून पुढे येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्‍नर व इर्गतपुरीत जमीन संपादित केली असून त्याचे 500 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आले आहे.