Sun, Nov 17, 2019 07:19होमपेज › Ahamadnagar › ७४ शिक्षकांचे ‘रेकॉर्ड’ गायब?

७४ शिक्षकांचे ‘रेकॉर्ड’ गायब?

Published On: Jan 13 2018 1:10AM | Last Updated: Jan 12 2018 10:29PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असतांना तब्बल 74 शिक्षकांचे रेकॉर्डच जिल्हा परिषदेकडे नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांना बोलावून त्यांच्याकडून कागदपत्रे मागविली आहेत. शिक्षण समितीच्या सभेतही यावरून शिक्षण विभागाची खरडपट्टी काढण्यात आल्याने शिक्षण विभागातील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे.

शिक्षण समितीची सभा सभापती तथा उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस सदस्य जालिंदर वाकचौरे, उज्ज्वला ठुबे, सुवर्णा जगताप, राहुल झावरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रकमांच्या काठमोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले आदी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षणाच्या बिंदू नामावलीचे काम सध्या सुरु आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची माहिती एकत्रित करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यात नोकरी करत असलेल्या 74 शिक्षकांची कुठलीही माहिती जिल्हा परिषदेकडे नसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले. त्यानुसार लगेचच त्या 74 शिक्षकांना जिल्हा परिषदेत बोलावून त्यांच्याकडून सेवा पुस्तकांसह इतर माहितीची तात्काळ माहिती मागविण्यात आली.

वर्षानुवर्षे जिल्ह्यात नोकरी करत असतांना शिक्षण विभागाकडे या शिक्षकांची माहितीच नसल्याने शिक्षण समितीच्या सभेत सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर माहिती जमा करण्यात येत असल्याचे उत्तर मिळाले.  या शिक्षकांची माहितीच उपलब्द्ध नसल्याने त्यांच्या बदलीसह, पदोन्नतीच्या मार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. यातील काही शिक्षक हे आंतरजिल्हा बदलीने बदलून आले आहेत.

सभेत चला खेळू या अंतर्गत 19 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान जिल्हास्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सन 2016- 17 या आर्थिक वर्षातील प्राप्त अनुदान 100 टक्के खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच चालू आर्थिक वर्षातील प्रशासकीय मान्यतानुसार तात्काळ निविदा कार्यवाही करून कार्यारंभ आदेश देण्याचेही निर्देश देण्यात आले.जिल्ह्यात एकही शाळाबाह्य मूल राहू नये यासाठी नियोजन करण्यास सांगण्यात आले.