Wed, Feb 20, 2019 08:38होमपेज › Ahamadnagar › 73 हजार घरांत ‘सौभाग्य’ प्रकाश!

73 हजार घरांत ‘सौभाग्य’ प्रकाश!

Published On: Jan 31 2018 11:48PM | Last Updated: Jan 31 2018 11:47PM नगर : प्रतिनिधी
 

केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेतून जिल्ह्यातील जवळपास 73 हजार कुटुंबीयांची घरे प्रकाशाने उजळून निघणार आहेत. दारिद्य्र रेषेखालील तब्बल 18 हजार गरीब कुटुंबांना मोफत वीजजोडणीद्वारे या योजनेचा लाभ मिळणार आहे. नाशिक परिमंडळात नुकताच या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. देशातील ग्रामीण व शहरी भागातील एकही घर वीजजोडणी विना राहू नये, असा या योजनेमागील उद्देश आहे. डिसेंबर 2018 अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे निश्‍चित करण्यात आलेले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्य्र रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच 9 वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिनपॉईंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्य्र रेषेवरील कुटुंब) अवघ्या  500 रुपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत 10 सामान हप्त्यांमध्ये भरावयाचे आहे. 

नगर जिल्ह्यातील 72 हजार 700 कुटुंबीयांना सौभाग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. यातील दारिद्य्र रेषेखालील 18 हजार 200 कुटुंबीयांना विनाशुल्क, तर दारिद्य्र रेषेवरील 54 हजार 500 कुटुंबीयांना नाममात्र पाचशे रूपये शुल्क भरून वीजजोडणी मिळविता येणार आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.