होमपेज › Ahamadnagar › नगरसेवक जाधवसह ७ जणांना अटक

नगरसेवक जाधवसह ७ जणांना अटक

Published On: May 10 2018 1:32AM | Last Updated: May 09 2018 11:48PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दगडफेक प्रकरणानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत काल (दि. 9) शिवसैनिकांची धरपकड सुरू केली. नगरसेवक सचिन जाधव व इतर सहा अशा 7 जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अटकसत्र सुरू करताच अनेक कार्यकर्ते, नेते शहरातून पसार झाले आहेत. 

अटक केलेल्यांमध्ये नगरसेवक सचिन तुकाराम जाधव, माजी नगरसेवक अशोक शामराव दहिफळे, दीपक सर्जेराव कावळे, रावसाहेब नारायण भाकरे,  विठ्ठल नानाभाऊ सातपुते, सुशांत गिरीधर म्हस्के, राजेंद्र मोहनराव पठारे यांचा समावेश आहे.

याबाबत माहिती अशी की, 7 एप्रिल रोजी केडगाव येथे दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी घटनास्थळी आलेल्या पोलिसांवर दगडफेक, धक्काबुक्की करून शासकीय वाहने व परिसरातील दुकानांची तोडफोड केली होती. घटनेनंतर 9 एप्रिल रोजी रात्री शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुतेसह नगरसेवक व इतर साडेपाचशे ते सहाशे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचे कलम वाढविण्यात आले होते. मात्र, राजकीय दबावापोटी आरोपींना अटक केली जात नाही. काही दिवसांपूर्वीच वरिष्ठ पातळीवरील दबावानंतर गुन्ह्यातील भादंवि 308 हे कलम मागे घेण्यात आले. कलम मागे घेताच नगरसेवक योगीराज गाडे याच्यासह 9 शिवसैनिक सोमवारी (दि. 7) पोलिसांना शरण आले. पोलिसांत हजर झाल्यानंतर त्यांना जामीन होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. अटक आरोपींची संख्या आता 16 झाली आहे.  

9 जण पोलिस कोठडीत असतानाही गुन्ह्यात आरोपी असूनही अनेक जण शहरात फिरत होते. काल (दि. 9) सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने शिवसैनिकांची धरपकड सुरू केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पोलिस पथकाने नगरसेवक सचिन जाधव याला मंगलगेट परिसरातून ताब्यात घेतले. इतर 6 जणांना वेगवेगळ्या ठिकाणावरून पकडले. आरोपींची धरपकड करण्यासाठी वेगवेगळी पथक तयार करण्यात आली होती. काही शिवसैनिक ताब्यात घेतल्याची वार्ता शहरात पसरताच गुन्ह्यात आरोपी असलेले अनेक नेते, कार्यकर्त्यांची पळापळ उडाली. दगडफेक प्रकरणात आरोपी असलेले अनेक जण शहरातून पसार झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची विशेष पथके आरोपींच्या शोधात होती.

गाडेसह 9 जणांच्या कोठडीत वाढ

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे, रावजी बाळाजी नांगरे (रा. साईबन कॉलनी, भिस्तबाग, सावेडी), प्रफुल्ल साळुंके (रा. भूषणनगर, केडगाव), गिरीष राजेंद्र शर्मा (रा. अजिंक्य कॉलनी, भूषणनगर), सुनील गोपाल वर्मा (रा. सातपुते गल्ली, केडगाव), अमोल शिवाजी येवले (रा. केडगाव), अभिजित शशिकांत राऊत (रा. केडगाव), दत्तात्रय तुकाराम नागापुरे (रा. नगर), राजेश वैजिनाथ सातपुते (रा. केडगाव) या 9 जणांना काल (दि. 9) दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी आरोपींना पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. पाटील यांनी आरोपींच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे.