होमपेज › Ahamadnagar › पासष्ठ वर्षांची आजी ३० वर्षांपासून चालवते मोटारसायकल

पासष्ठ वर्षांची आजी ३० वर्षांपासून चालवते मोटारसायकल

Published On: Mar 11 2018 11:39AM | Last Updated: Mar 11 2018 11:39AMसंगमनेर : प्रतिनिधी

हिला कधीच कोणत्या क्षेत्रात कमी नसल्याचे अनेक महिलांनी आपल्या कृतीतून  वेळोवेळी दाखवून देण्याचे काम केले आहे. साकूर येथील इंदुबाई भाऊसाहेब ढेंबरे या 65 वर्षीय वृद्ध महिलेने तीस  वर्षांपासून मोटारसायकलवरून भाजीपाला विकून शून्यातून प्रगती साधत आज हॉटेल मालकापर्यंत मजल गाठली आहे.

ग्रामीण भागातील महिलांचे चूल आणी मूल या पलीकडे त्याचे विश्‍व नसायचे. त्यामुळे  एखादी 60 ते 65 वर्षाची नऊवारी घातलेली एखादी आजी भन्नाट गाडी चालवेल, अशी कल्पनाही कोणी केली  नसेल. तीस वर्षांपूर्वी पतीने साथ सोडलेली असताना आपल्या लहान  मुलींना घेवून इंदुबाईंनी वडिलांचे घर गाठले. वडिलांवर ओझे न बनता  त्यांनी शेतीत कष्ट करायला सुरूवात केली. मुलगा नसल्याने  शेतीमाल शहरात न्यायचा कसा, असा प्रश्‍न  त्यांना पडला. यावर मात करत त्या चक्क मोटरसायकल चालवायला  शिकल्या.

कित्येक वर्षे त्यांनी दररोज पन्नास साठ किमी प्रवास करत आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला आणि त्यातून मिळणार्‍या पैशांवर आपल्या उदरनिर्वाह भागवला. भाजीपाला विक्रीतून पुढे  बोलेरो गाडी घेतली आणि त्यानंतर त्यांनी साकूर गावात एक हॉटेलही चालू केले. त्या हॉटेलमध्ये स्वतः सर्व प्रकारच्या भाज्या व तंदूर भट्टीवर छान रोट्या बनवतात. इंदू आजीच्या हातचं व्हेज ,  नॉनव्हेजचे जेवण खाण्यासाठी खवय्यांचीही मोठी रीघ लागत आहे.