Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यातील ६५ हजार शेतकरी कर्जमुक्त

जिल्ह्यातील ६५ हजार शेतकरी कर्जमुक्त

Published On: Dec 13 2017 1:52AM | Last Updated: Dec 12 2017 11:00PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे जिल्ह्यातील 65 हजार शेतकरी आतापर्यंत कर्जमुक्त झाले आहेत. तर 67 हजार शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभाचा फायदा मिळाला आहे. यासाठी तब्बल 453 कोटींची रक्कम शेतकर्‍यांच्या कर्ज खाती जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कर्जमाफीच्या जिल्ह्याच्या दुसर्‍या ग्रीन लिस्टमधील 35 हजार 997 शेतकर्‍यांच्या खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. खात्यांची तपासणी झाल्यानंतर कर्जमाफीचे पैसे खात्यावर वर्ग करण्यात येणार असून, शासनाकडून जिल्हा बँकेला 453 कोटी 45 लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दीड लाखापर्यंत कर्ज असलेल्या 56 हजार 64 शेतकर्‍यांच्या खात्यावर 273 कोटी 9 लाख जमा करण्यात आले आहेत. तर दीड लाखाच्या पुढील कर्ज असलेल्या जिल्हा बँकेच्या 67 हजार 725 शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभाच्या बचत खात्यावर 102 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या 9 हजार 571 शेतकर्‍यांच्या खात्यावर 77 कोटी 64 लाख रुपये दीड लाखापर्यंतच्या कर्जासाठी जमा झंझाले आहेत.

कर्जमाफीसाठी शासनाने सुरुवातीला पहिली ग्रीन लिस्ट तयार केली होती. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3 हजार 256 शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यांच्या कर्जमाफीसाठी 17 कोटी 25 लाखांची रक्कम बँकेच्या खात्यावर शासनाने जमा केली. 2 हजार 301 शेतकर्‍यांच्या खात्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यावर 12 कोटी 24 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. यादीप्रमाणे जसजशी खात्यांची तपासणी पूर्ण होत आहे, तसतशी कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या कर्ज खाती जमा करण्यात येत आहे.

दुसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये जिल्हा बँकेच्या 77 हजार 939 शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी 395 कोटी 66 लाखांची कर्जमाफी करण्यात येत आहे. शासनाने त्याची रक्कम बँकेच्या खात्यावर जमा केली. आगामी आठवडाभरात पहिल्या व दुसर्‍या ग्रीन लिस्टमधील सर्व शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची शक्यता असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.