Fri, Apr 26, 2019 09:33होमपेज › Ahamadnagar › भिंगार नाला येथे ६३ किलो गांजा पकडला

भिंगार नाला येथे ६३ किलो गांजा पकडला

Published On: May 27 2018 1:16AM | Last Updated: May 26 2018 11:26PMनगर : प्रतिनिधी

इंडिका कारमधून गांजा घेऊन जाणार्‍या दोघांना पोलिसांनी 63 किलो गांजासह पकडले. भिंगार नाल्याजवळ कँप व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने काल (दि. 26) दुपारी 4 वाजता ही कारवाई केली.

अटक केलेल्यांमध्ये सादीक सुभान शेख (रा. रमाजीनगर, केडगाव), आशिष अरुण आडेप (रा. नेताजी सुभाष चौक, चितळे रस्ता, नगर) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून गांजा व कार असा एकूण पावणेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नगर-सोलापूर रस्त्यावरून इंडिका कारमधून दोन जण गांजा घेऊन येत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना खबर्‍याकडून मिळाली. त्यावरून कँप पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने, सहाय्यक फौजदार राजेंद्र गायकवाड, कर्मचारी राजेंद्र सुद्रिक, ज्ञानेश्‍वर शिंदे, दत्तात्रय पोटे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, कर्मचारी भाऊसाहेब काळे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर आदींसह नायब तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यासह दोन पंचाच्या पथकाने भिंगार नाल्याजवळ नाकाबंदी केली. नाकाबंदी सुरू असताना दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जामखेडहून नगरच्या दिशेने एक इंडिका कार (क्र. एमएच 16, एजे 1895) येत होती. या कारमध्ये 15 निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये गांजाचे चौकोनी बॉक्स मिळून आले. त्यात एकूण साडेनऊ लाख रुपयांचा 63 किलो 36 ग्रॅम गांजा होता. 

पोलिसांनी गांजा, इंडिका कार, मोबाईल हॅण्डसेट असा एकूण 11 लाख 71 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षिण भारतातून आणल्याची शक्यता

पोलिसांनी जप्त केलेला गांजा घेऊन आलेली इंडिका कार ही जामखेडच्या दिशेने नगरकडे येत होती. पोलिसांनी यापूर्वीही याच दिशेने आलेला गांजा चांदणीच चौकात पकडला होता. दक्षिण भारतातून नगरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजा येतो, असे यापूर्वीच्या तपासातून निष्पन्न झालेले आहे. शनिवारी पकडलेला गांजाही तेलगंणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक यापैकी एका ठिकाणावरून आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे.