होमपेज › Ahamadnagar › 62 विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण

62 विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण

Published On: Aug 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 01 2018 1:45AMसंगमनेर : प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेत शिकणार्‍या 62 विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्यामुळे एकच घबराट पसरली आहे. या विद्यार्थ्यांना घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यातील  14 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

पिंपळदरी येेथील बाळनाथ रंधे यांच्या रामकृृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेत सुमारेे 65 मुले शिक्षण घेत आहेत. त्या सर्व मुलांना सोमवारी (दि.30) सायंकाळी अचानक  जुलाब व उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे संस्थेतील शिक्षकांची एकच धावपळ उडाली. मुलांचे पालकही  घाबरून गेले. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना   तात्काळ घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

संगमनेर पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी घारगाव आरोग्य केंद्रात धाव घेवून डॉ. प्रल्हाद बाबंळे, डॉ. बी. एस. डामसे, डॉ. गजानन मोरे यांना उपचार सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. तपासणी केल्यानंतर या विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो सदृश आजाराची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. संगमनेर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, घारगावचे पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांनी या विद्यार्थ्यांची भेट देऊन  विचारपूस केली.  

घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणार्‍या 62 विद्यार्थ्यांमधील काही मुलांना जास्त त्रास जाणवू लागल्यामुळे सकाळी प्रथमतः 8 मुलांना तसेच  दुपारी पुन्हा 6 मुलांना  पुढील उपचारासाठी लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल केले.  त्यातील 2  जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर 28 विद्यार्थ्यांवर उपचार करून तयांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच 18 विद्यार्थ्यांवर घारगावच्या प्राथमिक आरोग्य  केंद्रात उपचार सुरू असून, त्यांची  प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, या घटनेची एकाही राजकीय नेत्याने दखल न घेतल्याने पालकवर्गातून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.