Mon, Aug 19, 2019 00:41होमपेज › Ahamadnagar › काजवा महोत्सवातून ६ लाखांचे उत्पन्न

काजवा महोत्सवातून ६ लाखांचे उत्पन्न

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 1:33AMभंडारदरा : वार्ताहर

संपूर्ण राज्याचा आकर्षणाचा  केंद्रबिंदू ठरलेला भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवांतर्गत पंधरवाड्यात सुमारे वीस हजार पर्यटकांनी कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्याला भेट देत काजव्यांनी उजळून निघणारी वृक्षसंपदा डोळ्यात साठविली. दरम्यान, भंडारदरा वन्यजीव विभागाने यंदा प्रथमच रात्री प्रवेशशुल्क आकारणी केल्याने सुमारे सहा लाखांचा महसूल जमा झाला.

भंडारदरा काजवा महोत्सवाच्या माध्यमातून मिळालेल्या महसुलाची रकमेतून पर्यटन विकास व आदिवासी गावामध्ये मूलभूत सोयीसुविधांसह स्थानिक आदिवासी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा केला जाणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे. 20 मे ते 7 जून असा काजवामहोत्सव कालावधी निश्चित करण्यात आला होता. या दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील पर्यटकांनी अभयारण्य परिसरात लावली.

यावर्षी भंडारदरा वन्यजीव विभागाने स्वनियंत्रणाखाली काजव्यांचा पर्यटकांना मनमुराद आनंद लुटण्यासाठी व्यवस्था केली होती. वन्यजीव विभागाचे नियंत्रण असलेल्या भंडारदरा शेंडी नाका व मुतखेल गावाच्या नाक्यावरुन पर्यटकांनी काजव्याचा आनंद घेण्यासाठी अभयारण्यमध्ये प्रवेश दिला जात होता. रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत पर्यटकांना अभयारण्य क्षेत्रात फिरण्याची मुभा देण्यात आली होती. 

स्थानिक गाईड व ग्राम परिस्थिती विकास समिती सदस्य राजूर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने वन्यजीव विभागाने आलेल्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवले.

महसुलातून 10 गावांना मिळणार लाभ

भंडारदरा वन्यजीव क्षेत्रातील 10 गावांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी निम्मानिधी व पर्यटन विकासासाठी निम्मानिधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी डी.टी.पडवळे यांनी दिली. यामध्ये भंडारदरा वन्यजीव क्षेत्रातील पेंडशेत, पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी, साम्रद, मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, तेरुंगण गावांना काजवा महोस्तवातर्गत मिळालेल्या महसुलाचा लाभ होणार आहे.