Mon, Jun 24, 2019 21:05होमपेज › Ahamadnagar › 555 शेतकर्‍यांना मिळणार कडबाकुट्टी यंत्र

555 शेतकर्‍यांना मिळणार कडबाकुट्टी यंत्र

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 10 2018 1:01AMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकर्‍यांना 50 टक्के अनुदानावर 555 शेतकर्‍यांना कडबाकुट्टी यंत्र मिळणार आहे. त्यासाठी 50 लाखांच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी 30 लाखांचा निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, अनुराधा नागवडे, सदस्य संदेश कार्ले, सदाशिव पाचपुते, अनिल कराळे, प्रताप शेळके, माधवराव लामखडे, सुप्रिया पाटील, अनिता हराळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील 667 शाळा खोल्यांच्या निर्लेखनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या शाळा खोल्या निर्लेखन करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर व दक्षिण यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा फी देण्याच्या योजनेसाठी 50 लाखांच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. माध्यमिक शाळेत शिकणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 50 लाखांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या निधीतून जनावरांना लाळ्या खुरकूत रोगावर औषधोपचार करण्यासाठी औषधे खरेदीकरिता 40 लाखांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हे लसीकरण जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम सुरु होण्यापूर्वी करण्याचे निर्देशही देण्यात आले. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या जनावरांना जंतनाशके पुरविण्याचा 50 लाखांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. यात शेळ्या, मेंढ्या व कोंबड्यांना जंतनाशक पाजणे, क्षारमिश्रचे पुरविणे, परजीवी कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

बुर्‍हानगर, मिरी-तिसगाव या पाणी पुरवठा योजनांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी व योजना चालविणारे निविदा धारक यांची 13 जुलै रोजी संयुक्त सभा बोलाविण्याची ठरले. नगर तालुक्यातील बुरूडगाव, वाकोडी आदी गावांसह जिल्ह्यातल्या दूषित पाणी असलेल्या गावांमध्ये ‘ग्रीन ब्रिजेस’ योजना राबविण्याची मागणी संदेश कार्ले यांनी केली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण- उत्तर, पाणीपुरवठा, या विभागात शाखा अभियंता पदे रिक्त असल्याने कामकाजात अडचणी येतात. त्यामुळे ही रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. मागील वर्षीचा 10 कोटींचा अखर्चित निधी यावर्षी खर्च करण्यासाठी मागणी करण्याची परवानगी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्याचे निर्देश देण्यात आले.

‘जिओ’ ने खोदले श्रीगोंद्यातील रस्ते

श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे रस्ते जिओ कंपनीने बेकायदा, विना परवानगी खोदले. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जिओ कंपनीकडे नुकसान भरपाई मागण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शासकीय विश्रामगृहामधील अतिक्रमण काढण्याची मागणी सदस्य सदाशिव पाचपुते यांनी केली.

या रस्त्यांच्या निविदा स्वीकारल्या

पारनेर तालुक्यातील निघोज ते कुदळेवस्ती वरवंडेवाडी रस्ता, एकरूखे ते न. पा. वाडी रस्ता, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. राहाता तालुक्यातील पिंपळस ते नगर मनमाड रस्ता डांबरीकरण, कोर्‍हाळे ते भांबरेमळा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. राहाता तालुक्यातील शिर्डी बायपास ते निमशिवडी रास्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामांच्या निविदा स्वीकृत करण्यात आल्या.