Tue, May 21, 2019 00:09होमपेज › Ahamadnagar › वृक्षलागवडीसाठी ५५ लाखांचे टार्गेट!

वृक्षलागवडीसाठी ५५ लाखांचे टार्गेट!

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 08 2018 11:45PMनगर : प्रतिनिधी

यंदाच्या पावसाळ्यात जिल्हाभरात जवळपास 50 लाख वृक्षलागवड झाली आहे. आगामी वर्षासाठी शासनाने 55 लाख 63 हजारांचे टार्गेट दिले आहे. शासकीय कार्यालयांना अधिक टार्गेट दिले गेल्यामुळे आता अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक होणार आहे. दरम्यान, दरवर्षी 31 ऑक्टोबर व 31 मे रोजी वृक्षगणना करण्यात येणार आहे.

दुष्काळ, पाणीटंचाई आणि इतर नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाने ‘हरित महाराष्ट्र’ उपक्रम हाती घेतला आहे. आजमितीस राज्यात 20 टक्के वनक्षेत्र आहे. ही टक्केवारी 33 पर्यंत नेण्याचा महाराष्ट्र शासनाने संकल्प केला आहे. त्यानुसाठी दरवर्षी वृक्षलागवड मोहिम राबविली जात आहे. सन 2017 पासून येत्या तीन वर्षांत राज्यभरात 50 कोटी वृक्षरोपणाचे उदिृष्ट ठरविण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याला 49 लाख 94 हजार वृक्षलागवडीचे टार्गेट शासनाने दिले होते. ते टार्गेट शंभर टक्के पूर्ण झाले आहे.  

आगामी 2019 या वर्षात राज्यभरात 33 कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक विभागाला 2 कोटी 23 लाख 23 हजार 800 वृक्षलागवडीचे टार्गेट दिले आहे. यामध्ये नगरच्या 55 लाख 63 हजार 850 वृक्षलागवडीचा समावेश आहे. 

नव्या टार्गेटनुसार जिल्ह्यासाठी कृषी विभागाला 6 लाख 72 हजार 100, नगरपालिका विभागाला 1 लाख 88 हजार 750, महापालिकेला 22 हजार 450, जिल्हाभरातील एकूण ग्रामपंचायतींना 41 लाख 99 हजार 700, महसूल विभागाला 45 हजार 200, कामगार विभागाला 87 हजार 900, सार्वजनिक बांधकाम विभागाला 64 हजार 150, पाणीपुरवठा विभागाला 62 हजार  750, ग्रामविकास विभागाला 5 हजार 400 दिले गेले आहे. त्यामुळे आगामी वर्षांत सर्वच शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचार्‍यांना अधिक काम करावे लागणार आहे. जिल्हास्तरीय अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन वृक्षलागवडीच्या वाटपाचे आदेश 15 सप्टेंबरपर्यंत निर्गमित करावेत, असे आदेश शासनाने जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.