होमपेज › Ahamadnagar › 541 विस्थापितांना नियुक्त्या!

541 विस्थापितांना नियुक्त्या!

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 10:57PMनगर : प्रतिनिधी

विस्थापित झालेल्या  607 शिक्षकांपैकी 541 शिक्षकांना शाळांवर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या झालेल्या ऑनलाईन बदल्यांप्रमाणेच दुसर्‍या टप्प्यात विस्थापित शिक्षकांचाही ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या आहे. तिसर्‍या टप्प्यात वंचित राहिलेल्या 76 शिक्षकांच्या बदल्या होतील. 

गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांना बदल्यांची प्रतीक्षा होती. त्यानुसार शासनाने गेल्या आठवड्यात शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या. बदल्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरतांना शिक्षकांना वीस शाळा निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यातील एका शाळेवर संबंधित शिक्षकाची नेमणूक होणार होती. मात्र जवळपास 620 शिक्षकांना वीस ठिकाणांपैकी शाळा न मिळाल्याने असे शिक्षक विस्थापित झाले होते.

मनाप्रमाणे बदल्या न झालेल्या या विस्थापित शिक्षकांनी गेल्या आठवडाभर जिल्हा परिषदेत येत बदल्यांची मागणी केली होती. तसेच संवर्ग 1 व 2 मधील अनेक शिक्षकांनी बनावट माहिती देत बदल्या करून घेतल्याचा आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. विस्थापित शिक्षकांच्या मागणीनुसार शिक्षण विभागाने संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांच्या माहितीची तपासणी गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत केली.

यात गटशिक्षणाधिकार्‍यांच्या पातळीवर गैरप्रकार झाल्याचा संशय आल्याने शिक्षणाधिकारी स्तरावर माहितीचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात आले. यामध्ये अनेक शिक्षकांची माहिती अपूर्ण असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच चुकीची माहिती देत बदली करून घेतलेल्या 8 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.

काल (दि. 11) जिल्हा परिषदेत येत विस्थापित शिक्षकांनी पदाधिकार्‍यांची भेट घेत चुकीच्या झालेल्या बदल्यांवर चौकशी करून त्यांच्या जागेवर नियुक्ती देण्याची विनंती केली होती. मात्र बदल्यांचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने पदाधिकारीही हतबल झाले होते. 76 शिक्षक अद्यापही विस्थापितच राहिले असल्याने त्यांच्या नियुक्तीचा आदेश कधी येणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.