होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यामध्ये पकडली सव्वा कोटीची वीजचोरी

जिल्ह्यामध्ये पकडली सव्वा कोटीची वीजचोरी

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 1:19AMनगर : प्रतिनिधी

महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी 30 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. स्थानिक अभियंते, कर्मचारी आणि इतर जिल्ह्यांतील भरारी पथकांनी संयुक्‍तपणे ही मोहीम राबविली. या मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण 1102 ग्राहकांच्या मीटरपैकी 487 जणांकडे वीजचोरी आढळून आली असून, संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू आहे. 

वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने जिल्ह्यात नुकतीच विशेष व व्यापक मोहीम राबविली. स्थानिक अभियंते व कर्मचार्‍यांचे पथक तसेच औरंगाबाद, कल्याण, पुणे, नाशिक येथील भरारी पथके यांनी स्वतंत्रपणे या मोहिमेत सहभाग घेतला. या पथकांनी जिल्ह्यातील नगर शहर, नगर ग्रामीण, कर्जत, श्रीरामपूर व संगमनेर या पाचही विभागांमध्ये सलग तीन दिवस व्यापक तपासणी मोहीम राबवून, मोठ्या प्रमाणात वीजचोरी उघडकीस आणली.

पथकाद्वारे 511 घरगुती, 480 व्यावसायिक व 111 औद्योगिक ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून 487 ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे समोर आले. त्यातील 221 घरगुती, 128 व्यावसायिक आणि 6 औद्योगिक अशा एकूण 311 ग्राहकांविरुद्ध वीज कायदा 2003 चे कलम 135 ते 138 नुसार तर 176 ग्राहकांवर कलम 126 नुसार कारवाई सुरू आहे. स्थानिक अभियंते व कर्मचार्‍यांच्या पथकाने 843 ग्राहकांकडे तपासणी करून 322 ठिकाणची वीजचोरी उघडकीस आणली. तर भरारी पथकाने तपासणी केलेल्या 259 ग्राहकांपैकी 165 जणांकडे वीजचोरी आढळून आली. विशेष मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ग्राहकांपैकी 44 टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांकडे वीजचोरी आढळून आली आहे. 

कलम 135 ते 138 नुसार 311 जणांना 81 लाख 69 हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले असून, 20 लाख 47 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यातील 12 जणांनी वीजचोरीचे 4 लाख 31 हजार तसेच दंडाची 91 हजार रुपयांची रक्कम भरली. तर 8 जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 126 प्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या 176 जणांना 48 लाख रुपयांच्या वीजचोरीचे बिल देण्यात आले असून, 10 जणांनी 3 लाख 64 हजार रुपयांचा भरणा केला आहे. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार आणि अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात अभियंते, कर्मचारी व भरारी पथकांनी परिश्रम घेतले.

वीजचोरीला प्रतिबंधासाठी सहकार्य करा

महावितरणची राज्यात सर्वाधिक थकबाकी नगर जिल्ह्यात आहे. जानेवारी अखेर जिल्ह्यातील एकूण 9 लाख 77 हजार 840 वीज ग्राहकांपैकी 6 लाख 27 हजार 137 ग्राहकांकडे 2 हजार 640 कोटी 10 लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. तर एप्रिल ते ऑक्टोबर 2017 दरम्यान जिल्ह्यातील 15.59 टक्के आणि वाणिज्यिक हानी 39.64 टक्के आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात वीजचोरीला  प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व वीज चोरीबाबत नजिकच्या महावितरण कार्यालयात माहिती द्यावी, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.