Sun, Nov 18, 2018 14:07होमपेज › Ahamadnagar › जिल्हाभरात ५० लाख वृक्षलागवड!

जिल्हाभरात ५० लाख वृक्षलागवड!

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 1:41AMनगर : प्रतिनिधी

यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या अंतर्गत जिल्ह्याला 49 लाख 93 हजार 510 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिले आहेत. 

50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड होणार आहे. जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात काल (दि.20) बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, नगर  विभागाचे उपवनसंरक्षक  आदर्श रेड्डी , उपजिल्हाधिकारी वामन कदम , सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक अरुण येलजाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 14 लाख 30 हजार, वन विभागास 30 लाख 20 हजार व  इतर यंत्रणेमार्फत  5 लाख 43 हजार 510  वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  यासाठी जिल्ह्यात 59 लाख 40 हजार पेक्षा अधिक रोपे तयार असल्याची माहिती  उपवनसंरक्षक रेड्डी यांनी बैठकीत दिली. या रोपांमध्ये कडूलिंब, सिसम, करंज, आवळा, चिंच, वड यासह  आठ ते दहा प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे. वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे मार्चअखेर पूर्ण  करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी महाजन  यांनी दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यात हरित सेनेची सभासद नोंदणी वाढण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी  केले.

जिल्ह्यात हरित सेना उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यत  1 लाख 76 हजार  हरितसेनेचे ऑनलाईन सदस्य झाले आहेत. वृक्ष लागवडीसाठी स्थळनिश्चिती करण्यात आली आहे. 99 टक्के स्थळनिश्चितीचे काम पूर्ण झाले असून, 31 मार्च 2018 पर्यंत उर्वरित खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी सांगितले.