होमपेज › Ahamadnagar › सफाई कामगारांच्या घरासाठी ५० लाख

सफाई कामगारांच्या घरासाठी ५० लाख

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:01AMकोपरगाव : प्रतिनिधी

कोेपरगाव नगरपालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांसाठी शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत 117 घरकुलांच्या कामांना तत्वत: मंजुरी मिळाली असून त्यासाठी 50 लाख रुपयांच्या वाढीव निधीसही मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात मुंबई येथे बुधवारी बैठक झाली. त्यात मंत्री कांबळे यांनी या योजनेस तत्वत: मान्यता देऊन कोपरगाव नगरपालिकेच्या अनुसुचित जाती घटकातील सफाई कर्मचार्‍यांसाठी वाढीव 100 घरकुलांना देखील याच बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.  आ.स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्‍न मार्गी लागावा म्हणून याबाबत आपण पाठपुरावा केला होता. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह संबंधीत खात्याचे सचिव यांच्याबरोबर बैठक घेऊन याबाबत लक्ष वेधले होते.  

यानंतर काल बुधवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत उपसचिव बी. आर. पिंगळे, अहमदनगर सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ लिपीक बाबासाहेब देव्हारे, कोपरगाव नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण साठे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत घरकुल वाढीस व निधीची वाढीस मंजुरी देण्यात आली.

आ. कोल्हे यांनी रमाई आवास योजना कामाचा केलेल्या पाठपुराव्यामुळे सफाई कामगारांना त्यांचे हक्‍काचे घर मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.