होमपेज › Ahamadnagar › केडगाव हत्त्याकांडानंतरचे ४८ तास...

केडगाव हत्त्याकांडानंतरचे ४८ तास...

Published On: Apr 10 2018 1:17AM | Last Updated: Apr 10 2018 12:41AMनगर : प्रतिनिधी

शनिवारी सायंकाळी सहा वाजता केडगावात सिनेस्टाईल थरार..त्यानंतर दगडफेक..पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न..रास्ता-रोको..एसपी कार्यालयात तोडफोड..चौकशीसाठी आणणलेल्या आरोपीला पळविणे.. बळाचा वापर करून कार्यकर्त्यांची धरपकड...वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची नगरला धाव...दोन आमदार पोलिसांना शरण येणे..मंत्र्यांचे दौरे..पोलिस निरीक्षकाचे निलंबन..एसआयटीकडून गुन्ह्याचा तपास..असा घटनाक्रम गेल्या 48 तासांपासून घडला आहे. सध्या हाच विषय चर्चेचा ठरला आहे.

गेल्या 48 तासांपासून पोलिस प्रशासन पूर्णवेळ याच कामात व्यस्त आहे. एकीकडे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती अशी असताना, दुसरीकडे गुरुवारी होणार्‍या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेमुळे पात्र उमेदवारांची यादी तयार करणे, बैठक व्यवस्थेचे नियोजन, शांतता समिती बैठक, केडगाव परिसर व न्यायालयात आरोपी आणते-नेतेवेळी लागणारा बंदोबस्त, लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका तयार करणे, वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालयांना घटनेचा तपशील देणे आदी कामांत पोलिस प्रशासन व्यस्त आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून चौकशीसाठी आणणलेल्या आरोपींना पळविण्याची घटना राज्यात पहिल्यांच घडलेली असल्याने, त्या आरोपींचीही शोधमोहीम सुरू आहे. 

शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केडगावात सिनेस्टाईल थरार घडला, तेव्हापासून पोलिसांची खरी कसोटी लागली आहे. शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांचा रविवारी नियोजित दौरा असल्याने बहुसंख्य पोलिस बंदोबस्त व वाहने शिर्डीला होती. कमी बंदोबस्तात आक्रमक झालेला जमाव नियंत्रणात आणण्याचे आव्हान होते. सहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे व पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्याविरुद्ध स्थानिक कार्यकर्ते संतप्‍त झाल्याने त्यांना तेथून हटविणे क्रमप्राप्त होते. मोठा जमाव व कमी पोलिसबळ अशा परिस्थितीत दगडफेक सुरू होती. नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू होते.

घटना खुनाची होती. आरोपींना शिक्षा होण्यासाठी आवश्यक पुरावे जमा करणे गरजेचे होते. त्यामुळे सुरुवातीला पंचनामा करून घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, मातीमिश्रीत रक्त, बंदुकीच्या निकामी पुंगळ्या आदींसह ‘फॉरेन्सिक’कडून तपासणी करून घेण्यासाठी इतर नुमने घेणे आवश्यक होते. उशीर झाल्यास पुरावे नष्ट होऊन त्याचा फायदा आरोपींना होऊ शकतो. त्यामुळे केडगावात शांतता प्रस्थापित करण्यासोबत गुन्ह्याचे पुरावे गोळा करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर होते. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह पोलिसांवर शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. आक्रमक भूमिका घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व परिस्थिती संयमाने हाताळावी लागत होती. 

केडगाव शांत होत नाही, तोच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयावर जमावाने हल्ला केला. कार्यालयाची तोडफोड करून चौकशीसाठी आणलेल्या आरोपीला पळवून नेण्यात आले. शिर्डी व केडगाव बंदोबस्तामुळे एसपी कार्यालयात कर्मचार्‍यांची संख्या अत्यल्प होती. महिला कर्मचार्‍यांनाही जमावाने धक्काबुक्की केली. शेकडोंच्या जमावातून हल्लेखोर ओळखून त्यांची धरपकड करावी लागली. या घटनेनंतर परिस्थिती चिघळू लागली. परिणामी मुंख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला व तेथील बंदोबस्त नगरला मागविण्यात आला. राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. मध्यरात्रीनंतर परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली. दीड वाजता केडगाव येथील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.

पहिली रात्र पूर्णपणे पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना जागून काढावी लागली. विशेष पोलिस महानिरीक्षक, अपर पोलिस महासंचालकांना मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास नगरला धाव घ्यावी लागली. पहिली रात्र जागलेल्या पोलिसांचे आव्हान दुसर्‍या दिवशीही संपलेले नव्हते. शिवसेनेने जिल्हाबंदची हाक देत ननगर शहरातून निषेध मोर्चा काढला. तसेच शिवसेनेचे तीन मंत्री, खासदार नगरला आले. वातावरण तणावग्रस्त असताना मयतांचा अंत्यविधी कुठल्याही अनुचित प्रकाराशिवाय करायचा होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस तणावतच होते. केडगावातील तणावाच्या परिस्थितीला दोषी धरून कोतवालीचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांना निलंबित करून सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या चौकशीचा आदेश झाला. येथे पोलिसांच्या मनोबलाची कसोटी असतानाही पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार्‍या आरोपींचा रात्रभर शोध सुरू होता.

सोमवारी सकाळी पुन्हा आ. शिवाजी कर्डिले पोलिसांना शरण आले. त्यांची सुरक्षा, अटकेची कार्यवाही एकीकडे सुरू होती, तर दुसरीकडे ‘एसआयटी’मार्फत तपास सुरू झाला. राजकीय वादातून खून झाल्याची फिर्यादी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यात अनेक आरोपी आहेत. तरीही त्यातून सत्य शोधून गुन्ह्याच्या मूळाशी जाऊन खर्‍या आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पोलिसांना पडली शस्त्र, काठ्यांची गरज

जमावाने हल्ला केला, त्यावेळी पोलिसांकडे साध्या काठ्याही नव्हत्या. जमावाला सामोरे जाण्यासाठी पोलिसांना काठ्यांची उणीव भासत होती. त्यामुळे रविवारी काठ्यांची खरेदी करण्यात आली. तसेच पोलिस मुख्यालय व पोलिस ठाण्यातील शस्त्रागारातील शस्त्रे बाहेर काढण्यात आली.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, Shivsainik murder case, Kedgaon, Kadgaon assassination,