Tue, Mar 19, 2019 05:22होमपेज › Ahamadnagar › कोतकर-ठुबे परिवाराला ४५ लाखांची मदत!

कोतकर-ठुबे परिवाराला ४५ लाखांची मदत!

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:04AMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील मयत शिवसैनिकांच्या कुटुंबियांची शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेना तुम्हाला वार्‍यावर सोडणार नाही. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्याची मागणी करु, अशा शब्दांत ठाकरे यांनी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांना धीर दिला. शिवसेनेच्या वतीने दोन्ही परिवाराला प्रत्येकी 22.50 लाख या प्रमाणे 45 लाखांची मदत ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली.

उध्दव ठाकरे यांचे नगरला आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम ठुबे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी ना. एकनाथ शिंदे, ना. रामदास कदम, ना. दिपक केसरकर, ना. विजय शिवतारे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, खा. सदाशिव लोखंडे, आ. विजय औटी, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपमहापौर अनिल बोरुडे सभागृह नेते गणेश कवडे आदींसह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

ठुबे यांच्या पत्नीने ठाकरे यांना पाहताच टाहो फोडला. माझ्या पतीच्या हल्लेखोरांना फासावर लटकवा, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी त्यांनी ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर ठाकरे यांनी कोतकर कुटुंबियांची भेट घेतली. कोतकर व ठुबे यांना न्याय मिळवून देण्यासाठी उज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्याची व फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी केली जाईल. शिवसेना पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे. तुमची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, ठुबे व कोतकर कुटुंबियांना शहर शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी 15.50 लाखाची ठेव पावती देण्यात आली. तर मुंबई शिवसेना व ना. एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपये व ना. शिवतारे यांनी प्रत्येकी 2 लाख रुपये अशी एकूण प्रत्येकी 22.50 लाख रुपये मदत ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्याचे दिलीप सातपुते यांनी सांगितले. जिल्हा शिवसेनेच्यावतीने सर्व तालुक्यातून भरीव स्वरुपात मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोयर्‍या-धायर्‍यांपासून आम्हाला वाचवा!

केडगाव पोटनिवडणूक व राजकीय वादातूनच संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे नेते पोलिस यंत्रणेवर दबाव टाकून तपास भरकटविण्याचा प्रयत्न करत आहेत. केडगावात अनेक वर्षांपासून यांची दहशत आहे. सर्वसामान्य शिवसैनिक अजूनही या सोयर्‍या-धायर्‍यांच्या दहशतीखाली आहेत. या दहशतीचा बिमोड करावा, अशी निवेदने ठुबे परिवार व स्थानिक महिलांनी उध्दव ठाकरे यांना यावेळी दिली.