Sat, Mar 23, 2019 18:30होमपेज › Ahamadnagar › आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ४३ कोटी रुपये

आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ४३ कोटी रुपये

Published On: Jul 16 2018 1:25AM | Last Updated: Jul 15 2018 11:51PMनगर : प्रतिनिधी

जिल्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 42 कोटी 93 लक्ष रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या आरोग्य केंद्राच्या बांधकाम प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिली.

जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामांचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेच्या समिती सभांसह सर्वसाधारण सभेतही मोठ्या प्रमाणावर सदस्यांनी इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली आहे. जवळपास 20 प्राथमिक केंद्रांच्या इमारतीच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी तातडीने निधीची आवश्यकता आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी यापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरावस्था झालेली आहे. काही इमारतींमध्ये पाऊस झाल्यानंतर गळती लागते. अनेक ठिकाणी भिंतींना चिरा गेलेल्या आहेत. त्यामुळे अशा इमारतींसाठी अजूनही जिल्हा परिषदेला निधीची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडे पुन्हा पाठपुरावा केल्यास जिल्हा परिषदेला निधी मिळू शकतो.

विखे म्हणाल्या की, तालुक्यांची गरज लक्षात घेऊन आरोग्य केंद्राच्या इमारत आणि कर्मचारी वसाहतीच्या बांधकामाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपाध्यक्षा राजश्री घुले व इतर पदाधिकार्‍यांनी याबाबत सातत्याने आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केल्यामुळे आरोग्य विभागाने या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी उपलब्ध करून देण्यास हिरवा कंदील दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची कामे करताना पायाभूत सुविधांची उपलब्धता करणे महत्त्वाचे असल्याने निर्णय प्रक्रियेत आरोग्य विभागाला सदैव प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोग्य केंद्रांमध्ये होणार कामे

जामखेड तालुक्यातील खर्डा, कर्जत तालुक्यातील राशिन, मिरजगाव, श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी, नगर तालुक्यातील जेऊर, जामखेड तालुक्यातील शिऊर, सोनेगाव, श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव, राहुरी तालुक्यातील सात्रळ, येथे आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीच्या व अधिकारी- कर्मचारी यांच्या निवासासाठी प्रत्येकी 30 लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच हा निधी उपलब्ध करून कामांना सुरूवात करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.