Fri, Mar 22, 2019 23:51होमपेज › Ahamadnagar › कर्जमाफी धारकांना 403 कोटींचे कर्ज

कर्जमाफी धारकांना 403 कोटींचे कर्ज

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 17 2018 10:29PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र ठरून लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा उभारी देण्यासाठी 403 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. कर्जमाफीत नसलेल्या शेतकर्‍यांसह एकुण 703 कोटींचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा बँकेच्यावतीने शेतकर्‍यांना दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना कर्ज स्वरूपात अर्थसाह्य देण्यात येते. यंदा खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेला 1489 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत हे कर्ज शेतकर्‍यांना घेता येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेवर अजून अंमलबजावणी सुरू आहे.
जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 2 लाख 73 हजार 169 शेतकर्‍यांना 8  ग्रीन लिस्टच्या आधारे 646 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. यात जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या आणि कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या 54 हजार शेतकर्‍यांना नव्याने 403 कोटी रुपयांच्या नवीन अर्थसाह्याचा समावेश आहे.

वसुली आली 41 टक्क्यांवर

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केल्यानंतर त्या परिणाम जिल्हा बँकेच्या वसूलीवर झाला आहे. आतापर्यंत बँकेची चालू वर्षाची अवघी 41 टक्के वसूली झाली आहे. मागीलवर्षी हे प्रमाण 48 टक्के होते. यासह जिल्हा बँकेने यंदा नियमित कर्जदारांना 299 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. त्यामुळे या कर्जाच्या वसुलीचे आव्हान बँकेसमोर आहे.