Tue, May 21, 2019 04:19होमपेज › Ahamadnagar › केडगाव हत्याकांड : कोतवालीचे 4 पोलिस बडतर्फ

केडगाव हत्याकांड : कोतवालीचे 4 पोलिस बडतर्फ

Published On: Apr 25 2018 8:26AM | Last Updated: Apr 25 2018 8:26AMनगर : प्रतिनिधी

केडगाव हत्याकांडानंतर शहरात निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रसंगी खातेबाह्य कृत्य केल्याच्या गंभीर आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल (दि. 24) रात्री याबाबतचा आदेश काढला आहे.

बडतर्फ कर्मचार्‍यांमध्ये अविनाश बर्डे, रवींद्र टकले, सुमीत गवळी व समीर सय्यद यांचा समावेश आहे. भारतीय संविधानाचे कलम 311 अन्वये ही कारवाई करण्यात आलेली आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड,
पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणानंतर शहरात कायदासुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. यावेळी काही पोलिस कर्मचार्‍यांनी खातेबाह्य कृत्य केल्याचा तक्रारी पोलिस अधीक्षक शर्मा यांच्याकडे झाल्या होत्या.

त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक शर्मा यांनी चौकशीचा आदेश दिला होता. सुमारे आठवडाभरापासून सदर प्रकरणाची चौकशी सुरू होती. या चौकशीत कोतवाली पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या चार पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस खात्यास अशोभनीय कृत्य केल्याचे उघड झाले. त्यांनी कामात हलगर्जीपणा करून पोलिस खात्यात न शोभणारे गंभीर स्वरुपाचे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर चौघांनाही मंगळवारी रात्री पोलिस अधीक्षक शर्मा यांनी भारतीय दंड विधानाचे कलम 311 अन्वये पोलिस खात्यातून बडतर्फ केले आहे. त्या कलमानुसार संबंधित  लोकसेवक हा लोकसेवक म्हणून
काम करण्यास अयोग्य असल्याचे त्याला नियुक्त करण्याचा अधिकार असलेल्या प्राधिकृत अधिकार्‍यास खात्री झाल्यास ते संबंधितास विनाचौकशी बडतर्फ करू शकतात. पोलिस कर्मचार्‍यास नियुक्तीचा अधिकारी पोलिस अधीक्षकांना आहे. त्यामुळे अधीक्षक शर्मा यांनी या अधिकाराचा वापर करून ही कारवाई केली आहे.