Mon, Mar 18, 2019 19:17होमपेज › Ahamadnagar › सोशल मीडियाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेवर घाव

सोशल मीडियाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेवर घाव

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:25PMनगर : प्रतिनिधी

शत्रू राष्ट्रांकडून बंदुकीच्या गोळीऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक, जातीय, वांशिक तणाव वाढविणारे मेसेज प्रसारित केले जात आहेत. त्या माध्यमातून देशातील एकात्मतेवर घाव घातला जात आहे. अशा परिस्थितीत देशाचे ऐक्य, अखंडत्व कायम राखण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. जाती, धर्म, वंश यापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन लष्कराचे मेजर जनरल ए. एस. कार्की यांनी केले. 

लष्कराच्या नगर येथील मॅकेनाईज्ड इन्फ्रंर्टी रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) येथे 391 प्रशिक्षणार्थी जवानांचा शपथविधी अखोरा ड्रिल मैदानावर शनिवारी (दि.28) पार पडला. याप्रसंगी मेजर जनरल कार्की बोलत होते. ब्रिगेडिअर सुब्रम्हण्यम तसेच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेजर जनरल कार्की म्हणाले, देशाच्या दृष्टीने लष्कर हे अत्यंत महत्त्वाचे असते. बाह्य शक्तींपासून देशाचे संरक्षण करण्याबरोबरच भूकंप, पूर या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सैन्य दलाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सैन्य दलासमोर या पारंपरिक आव्हानाबरोबरच आता सोशल मीडियाचेही मोठे आव्हान उभे आहे. शत्रू राष्ट्रांकडून बंदुकीच्या गोळी ऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या एकात्मतेवर घाव घातला जात आहे. जातीय, धार्मिक आणि वांशिक भेदभाव निर्माण करणारे मेसेज प्रसारित केले जात आहे. त्या माध्यमातून देश तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने सतर्क राहून देशाची एकाता, अखंडता कायम राखली पाहिजे. जात, धर्म, वंश यापेक्षा देश हिताला प्रथम प्राधान्य असले पाहिजे.

आपल्या सैन्य दलाला उज्ज्वल परंपरा आहे. विविध देशांमध्ये शांती सेनेच्या माध्यमातून सैन्य दलाने मोठे कार्य केले आहे. या परंपरेला साजेशे वर्तन असले पाहिजे. प्रत्येक सैनिकावर तो कार्यरत असलेल्या युनिटची प्रतिष्ठा ठरत असते. सैनिकाचे वर्तन हे शिस्तप्रिय व आदर्श असले पाहिजे. सैन्य जीवनाबरोबरच समाजामध्ये ही एक आदर्श व्यक्ती म्हणून वर्तन राहिले पाहिजे.

सूरज शर्मा यांना जनरल सुंदरजी सुवर्णपदक, केशव बिष्टा यांना एल. डिसूजा रौप्य पदक, अरविंद गुर्जर यांना जनरल पंकज जोशी कांस्य पदक, तर दनस्वरंग रामचैरी यांस ड्रील सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. जवानांना देशसेवेची शपथ देण्यात आली. शपथविधीनंतर जवानांनी शहीद स्मारकास अभिवादन केले. जवानांच्या कुटुंबीयांचा मेजर जनरल कार्की यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

बांगलादेशच्या अधिकार्‍यांचे पथक

एमआयआरसी येथील अखोरा ड्रिल मैदानावर पार पडलेल्या या शानदार शपथविधी सोहळ्याला बांगला देशच्या लष्करी अधिकार्‍यांचे एक पथक उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याची शानदार परेडला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.