Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Ahamadnagar › ३९० कोटींचा हवाला गैरव्यवहार!

३९० कोटींचा हवाला गैरव्यवहार!

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:31PM

बुकमार्क करा
पारनेर : प्रतिनिधी   

तब्बल 390 कोटी रुपयांच्या निर्यात करामधील अवैध सूट; तसेच हवाला  गैरव्यवहारप्रकरणी भाळवणी पं.स.गणाच्या सदस्या सुनंदा धुरपते यांचा पती सुरेश ऊर्फ सूर्यभान धुरपते यास महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबईत अटक केली. या गैरव्यवहारप्रकरणी धुरपते यास गेल्या जून महिन्यातच नोटीस बजावली होती. त्यामुळे भारत सोडून दुबईकडे पलायन करण्याच्या तयारीत असताना त्याला मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच जेरबंद करण्यात आले. 

धुरपते याच्या मुंबईतील संकेत ओव्हरसिज या खासगी कंपनीमार्फत आयात-निर्यात व्यापारातील क्‍लिअरिंग एजंटचे काम पाहिले जात होते. शासकीय करावर नकली चलन फॉर्मद्वारे अवैधरीत्या सूट मिळविणार्‍या निर्यातदारांच्या रॅकेटशी धुरपते याच्या संकेत ओव्हरसिजचे कनेक्शन होते. बनावट चलन फॉर्म भरून देण्यात येऊन 5 हजार डॉलरपर्यंतची रक्‍कम देशात आणण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. बनावट चलन फॉर्म कस्टम अधिकार्‍यांनी पारित केल्यानंतर परदेशी चलन बँकेत जमा केले जात असे. या व्यवहारात व्यापार्‍यांकडून निर्यात जास्त दाखवून, जास्त नफा कमविण्याचा धंदाही करण्यात येत होता.

100 रूपये मूल्याच्या वस्तूची किंमत अनेक पटींनी अधिक असल्याचे भासवूनही शासनास गंडा घालण्यात येत होता. महसूल गुप्तवार्ता विभागास या रॅकेटची कुणकुण लागल्यानंतर, यातील एकूण 11 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यात एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे. तर धुरपते याच्या नावे तपास, शोध व अटकेसाठी गेल्या जून महिन्यात नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावण्यात आल्यानंतर संचालनालयाने उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरे देताना धुरपते याची भंबेरी उडाली होती. त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार असतानाच,  तो देश सोडून दुबईत पलायन करण्याच्या तयारीत होता. गुप्तवार्ता संचालनालयाचे पथक मात्र त्याच्या मागावरच होते. गेल्या महिन्यात धुरपते हा दुबई येथे जाण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचला. त्याच्या पासपोर्टची पडताळणी सुरू असताना, विमानतळ अधिकार्‍यांनी महसूल संचालनालयाच्या अधिकार्‍यांना सावध केले. दुबईच्या विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच धुरपते हा विमातनतळ सुरक्षा तसेच महसूल संचालनालयाच्या सापळ्यात अलगद अडकला.   

अवैध मार्गाने निर्यात करून गैरव्यवहार करणार्‍या व्यापार्‍यांचा प्रमुख हस्तक म्हणून धुरपते कार्यरत होता. हवालामार्फत व्यवहारासाठीही धुरपते याचेच कनेक्शन कार्यरत होते. त्यातून अनेक व्यापार्‍यांनी शासनाच्या कोट्यवधी रूपयांच्या करास चुना लावला आहे. रूमस्टर ट्रेडिंग प्रा. लि., बॉल्टन ट्रेडालिंक प्रा. लि., अल-हिंद एक्सपोर्टस् अ‍ॅण्ड इंम्पोर्टस् व सिस्की रेमन्टस् या कंपन्या या गैरव्यवहारात गुंतलेल्या आहेत. धुरपते यास ताब्यात घेतल्यानंतर हवालामार्फत व्यवहार झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.