Wed, May 22, 2019 17:02होमपेज › Ahamadnagar › सावेडीत 38 लाखांच्या पावडरचा अपहार

सावेडीत 38 लाखांच्या पावडरचा अपहार

Published On: Feb 12 2018 1:47AM | Last Updated: Feb 11 2018 10:47PMनगर : प्रतिनिधी

कॅडबरी बोर्नव्हिटा कंपनीची 38 लाख 64 हजार रुपयांची पावडर असलेले 970 बॉक्स इंदोर येथे पोहोच न करता त्याचा अपहार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मध्यप्रदेश येथील फिर्याद कोल्हापूर येथे वर्ग झाली होती. तेथून हा गुन्हा शून्य क्रमांकाने शनिवारी (दि. 10) तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भारत दीप लॉजस्टिक कंपनीचे मालक संदीपकुमार रणसिंह, व्यवस्थापक झिलेसिंग पुनिया (दोघे रा. जीएलआयजी, जी 4, केएचबी कॉलनी, हुतागल्ली, म्हैसूर, कर्नाटक), चालक लालचंद (रा. बिकानेर), शौकीन इस्माईल (रा. निगाव फुलेदी, ता. पुनहाना, जि. नह, हरियाणा) यांचा समावेश आहे. 

याबाबत संदीपकुमार सुनिअर दिलबाध सिंह सुनिअर (वय 42, रा. सेक्टर 40 सी, चंदीगढ, हल्ली रा. ओखला इंडस्ट्रिअल एरिया, फेस 1, नवी दल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संदीपकुमार यांच्या कंपनीने ऑर्डरप्रमाणे इंडिया फ्रूट कॅडबरी बोर्नव्हिटा कंपनीचे 38 लाख 64 हजार 912 रुपयांचे 970 बॉक्स इंदोर (मध्यप्रदेश) येथील डेपोत पोहोच करण्यासाठी भारत दीप लॉजिस्टिक कंपनीच्या ताब्यात कोल्हापूर येथील वारणा कंपनी येथून दिला. तो माल चालक लालचंद याने मालमोटारीत (क्र. आरजे 49, जीए 1241) भरला. त्यानंतर मालमोटार घेऊन चालक नगरमधील (गणेश चौक, सिव्हिल हडको, सावेडी) रजा अ‍ॅटो मोटर्स येथे आला. त्यानंतर चालक शौकीन शेख इस्माईल हा 25 ऑक्टोबर 2017 रोजी ती मालमोटार घेऊन देवसनाका इंदोर येथील कॅडबरी डेपोकडे निघाला. परंतु, कॅडबरीची पावडर घेऊन निघालेली मालमोटार इंदोर येथील डेपोत पोहोच झालीच नाही. 

याप्रकरणी संदीपकुमार सुनिअर यांनी इंदोर (मध्यप्रदेश) येथील लसुडिया पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याची सुरूवात कोल्हापूर येथील वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने हा गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला. तपासातून सावेडी उपनगरातून मालमोटार निघाल्यानंतर गायब झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने हे करीत आहेत.