Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Ahamadnagar › सोनईत बसविणार 38 सीसीटीव्ही कॅमेरे

सोनईत बसविणार 38 सीसीटीव्ही कॅमेरे

Published On: Aug 22 2018 12:53AM | Last Updated: Aug 21 2018 11:44PMसोनई : वार्ताहर

सोनई गाव, पेठ, मुख्य रस्ते, चौक या भागात अंतर्गत सुरक्षा व शांतता रहावी, दरोडे, घरफोड्यांसारख्या घटनांनंतर गुन्हेगारांची त्वरीत नाकेबंदी करता यावी, गुन्हेगारांची ओळख पटावी, यासाठी सोनई भागात 38 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बदविण्याचा निर्णय ग्रामस्थ व व्यापार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने यांच्या संकल्पनेतून या योजनेसाठी सोमवारी (दि. 21) रात्री सोनई पेठेतील राम मंदिरात  बैठक आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीसाठी भरपावसात 50-60 व्यापारी, ग्रामस्थ, प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत जागेवरच 1 लाख रुपयांचा देणगी सहभाग घोषीत करण्यात आला. ही रक्कम लगेचच ठेकेदार इलियास शेख यांच्याकडे देण्यात आली. दोन दिवसात हे काम सुरु करण्यात येऊन 15-20 दिवसात काम पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 

प्रास्ताविकात सहाय्यक निरीक्षक देशमाने यांनी सर्वांचे स्वागत करुन सध्याचे पोलिस मनुष्यबळ, कार्यक्षेत्रातील गावांची संख्या, चालणारे कामकाज याबाबत माहिती दिली. अत्याधुनिक कॅमेरे यंत्रणा बसविल्यास गुन्हेगारांवर वचक बसून चोर्‍या, दरोडे, घरफोड्या इत्यादी प्रकारांना मोठा आळा बसून शांतता सुव्यवस्था राहिल व पोलिस यंत्रणेच्या कामाला हातभार लागेल, असे देशमाने म्हणाले. 

या बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष काका डफळ, सामाजिक कार्यकर्ते शिवलाल बाफना, किरण चंगेडीया, सुमित चंगेडीया, सोमनाथ बंग, किरण बंग, महावीर चोपडा, जुगल बंग, प्रदीप अट्टल, प्रदीप चंगेडीया, विजय भळगट, आनंद भळगट, गौरव बंग आदींसह ग्रामस् थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पोलिस उपनिरीक्षक ससाणे, गुप्त वार्ता विभागाचे पोलिस नाईक बाबा पायमोडस यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. सोमनाथ बंग यांनी आभार मानले. 

प्रत्येक चौकात व मुख्य रस्त्यांवरील व्यावसायिक व ग्रामस्थांकडून देणग्या स्विकारण्याची जबाबदारी पंच कमिटीकडे सोपविण्यात आली. सोनई पोलिसांची संकल्पना व ग्रामस्थ, व्यापार्‍यांचा प्रतिसाद यातून प्रत्यक्षात येणारे 38 कॅमेर्‍यांचे एकत्रित चित्रीकरण थेट सोनई पोलिस ठाणे अंमलदाराशी जोडले जाणार आहे.

हा प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरू शकेल. गुन्हेगारीला मोठा आळा बसेल. त्यासाठी सर्वांनीच देणगीत सहभाग देऊन सोनई पॅटर्न यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले यांनी समारोपात केले.