Sun, Jul 12, 2020 22:11होमपेज › Ahamadnagar › नाशिक विभागातील 35 तहसीलदार लवकरच होणार उपजिल्हाधिकारी

नायब तहसीलदारांच्या आशा पल्‍लवीत

Published On: Jul 19 2019 2:23AM | Last Updated: Jul 19 2019 2:23AM
नगर : प्रतिनिधी 

राज्यभरातील 177 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्‍नती दिली जाणार आहे. यामध्ये नाशिक विभागातील 35 तहसीलदारांचा समावेश आहे. या तहसीलदारांना 15 ऑगस्टपर्यंत पदोन्‍नती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदारपदाच्या पदोन्‍नतीची वाट पाहाणार्‍या नायब तहसीलदारांच्या आशा पल्‍लवीत झाल्या आहेत. 

महसूल विभागातील अधिकार्‍यांची अनेक वर्षांपासून पदोन्‍नती रखडली आहे. विशेषत: तहसीलदार संवर्गातील अनेक अधिकारी पदोन्‍नतीच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर शासनाने 177 तहसीलदारांना पदोन्‍नती देण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्यानुसार शासनाने 24 जून 2019 रोजी  उपजिल्हाधिकारीपदी  पदोन्‍नतीस पात्र असणार्‍या  राज्यभरातील 177 तहसीलदारांची महसूल विभागनिहाय यादी जाहीर केली. या यादीत नाशिक विभागातील 35 तहसीलदारांचा समावेश आहे. यामध्ये नगर जिल्ह्यात  तहसीलदार म्हणून काम केलेले गणेश मरकड, राजेंद्र थोटे, वंदना खरमाळे, शर्मिला भोसले, हेमा बडे, अप्पासाहेब शिंदे, भारती सागरे, सुभाष दळवी, सुधीर पाटील, अनिल दौंडे, विजयकुमार ढगे, दादासाहेब गिते, सदाशिव शेलार व मनीषा राशीनकर आदींंचा समावेश आहे. 

या तहसीलदारांचा गेल्या 10 वर्षांतील सर्व परिपूर्ण मूळ गोपनीय अहवाल, संबंधित अहवालावरील प्रतिकूल शेरे, गेल्या वर्षा ज्या पदांवर काम केले त्यांचा सेवा तपशील, या अधिकार्‍यांविरुध्द विभागीय चौकशी तसेच फौजदारी कारवाई प्रस्तावित आहे का, आदी विविध माहिती शासनाने मागविली होती. त्यानुसार विभागीय आयुक्‍तांनी सदर तहसीलदारांची माहिती शासनाकडे 5 जुलै 2019 रोजी दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पदोन्‍नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या तहसीलदारांना 15 ऑगस्टपर्यंत पदोन्‍नती मिळण्याची शक्यता वाढली आहे.

राज्यभरातील 177 पैकी जवळपास शंभर तहसीलदारांना पदोन्‍नती मिळणार आहे. त्यामुळे तहसीलदारपदांच्या अनेक जागा रिक्‍त होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत तहसीलदार हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतात. ऐन निवडणुकीत ऐवढ्या मोठया जागा रिक्‍त ठेवणे अडचणीचे ठरणार आहेत. त्यामुळे तहसीलदारपदांची पदोन्‍नती होताच,  शासनाच्या वतीने नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्‍नती दिली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कार्यरत माधुरी आंधळे,  चंद्रशेखर शितोळे, अर्चना भाकड, वैशाली आव्हाड आदींसह पात्र नायब तहसीलदार लवकरच तहसीलदारपदी विराजमान होण्याची शक्यता बळावली आहे.