Fri, Feb 22, 2019 07:58होमपेज › Ahamadnagar › दूध संघात ३५ लाखांचा गैरव्यवहार

दूध संघात ३५ लाखांचा गैरव्यवहार

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:33AMनगर : प्रतिनिधी

तालुका दूध संघाच्या एमआयडीसीमधील दूध शीतकरण केंद्रामध्ये खाजगी दुधाचे शीतकरण केले जात आहे. प्रतिदिन दहा ते वीस हजार लिटर दुधाचे शीतकरण करून पुनर्जीवन समितीने सुमारे 35 ते 40 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, असा आरोप नगर तालुका दूध संघाचे कामगार प्रतिनिधी तायगा शिंदे यांनी केला आहे. 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, दूध संघाचे 2005 ते 2007 या कालावधीत संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे संघाचे 2 कोटी 2 लाखांचे नुकसान झाले आहे. संघावर अवसायकाची नियुक्‍ती झाली होती. त्यानंतर संघाचे पुनर्जीवन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. 

या समितीमध्ये गोरक्ष पाराजी पालवे, उद्धव अमृते, रोहिदास कर्डिले, सुभाष लांडगे, गुलाब काळे, भाऊसाहेब काळे, बजरंग पाडळकर, मोहन तवले, अर्जुन गुंड, चंद्रभान धामणे यांचा समावेश आहे. दूध संकलन अधिकारी म्हणून बाळासाहेब घोडके हे कामकाज पाहत आहेत.

या समितीने दि.20 ऑक्टोंबर 2016 रोजी कार्यभार स्वीकारला. या समितीने पदभार स्वीकारून 18 महिन्यांचा कालावधी झाला आहे. या कालावधीत संघाच्या एमआयडीसीतील दूध शीतकरण केंद्रामध्ये तुळजाभवानी ट्रेडर्स फर्म मार्फत प्रतिदिन दहा ते वीस हजार लिटर दुधाचे शीतकरण केले जात आहे. या समितीने 300 ते 400 दूध टँकरचे शीतकरण करून 35 ते 40 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणाची चौकशी राज्याचे दुग्ध विकास खात्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार नाशिक विभागीय अधिकार्‍यांकडे चौकशीचा सोपविण्यात आली आहे.

पुनर्जीवन समितीने दर आठवड्याला कामकाजाचा प्रगती अहवाल विभागीय कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. तरीही हा अहवाल सादर केला जात नाही. या समितीचे कामकाज संघाच्या हिताचे नाही. पुनर्जीवन समिती तातडीने बरखास्त करून अवसायकांकडे पदभार सोपवावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.