Sun, Mar 24, 2019 22:56
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › मिरजगाव सोसायटीत ३५ लाखांचा गैरव्यवहार

मिरजगाव सोसायटीत ३५ लाखांचा गैरव्यवहार

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 1:36AMकर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील मिरजगाव सेवा संस्थेची बाजारपेठेजवळील मोक्याची सुमारे एक कोटींची जागा अवघ्या दोन लाखामध्ये विक्री करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याप्रकरणी सरपंच आणि संस्थेच्या सभापतींसह (चेअरमन) संचालक मंडळावर 34 लाख 16 हजार 564 रुपयांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत वसुली न झाल्यास पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे आदेश कर्जतच्या सहाय्यक निबंधक डॉ. अंजली वाघमारे यांनी संस्थेचे सचिव डी. टी. महारनवर यांना दिले आहेत. त्यामुळे मिरजगावात एकच खळबळ उडाली आहे.

मिरजगाव सेवा संस्थेची बाजारपेठेजवळ मोक्याची जागा आहे. या जागेचे बाजार मूल्य अंदाजे 1 कोटींच्या आसपास आहे. परंतु, सरपंच खेतमाळीस, संस्थेचे सभापती बनकर आणि संचालक मंडळाने संगनमताने ही जागा अवघ्या 2 लाखांमध्ये विकून मोठा गैरव्यवहार केल्याची तक्रार उपसरपंच अमृत लिंगडे यांनी सहकार आयुक्त व सहाय्यक निबंधकाकडे केली होती.  

सहकार आयुक्तांना दिलेल्या पत्रात लिंगडे यांनी म्हटले आहे की, सध्या सर्वत्र जागांचे भाव वाढले आहेत. नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव हे कर्जत तालुक्यातील बाजारपेठेचे मोठे गाव आहे. या गावातही जागांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. याच गावात मिरजगाव सेवा संस्थेची सिटी सर्व्हे नंबर 1316, 1318 व 612 अशी जागा आहे. या जागेचे ऐकून क्षेत्र  2227.4 चौ. मी. आहे. संस्थेच्या संचालक मंडळाची 17 मे 2017 रोजी सभा झाली. त्यामध्ये ही जागा विकण्याचे अधिकार संस्थेचे संचालक नितीन ज्ञानोबा खेतमाळस यांना देण्यात आले होते. ही जागा विकण्यासाठी सहाय्यक निबंधकांनी 14 जुलै 2017 रोजी काही अटी व शर्थींवर परावनगी दिली आहे.

या जागेच्या ग्रामपंचायत नमुना नं 8 च्या उतार्‍यावर भोगवटदार म्हणून मिरजगाव ग्रामपंचायतीचे नाव आहे. या जागेची स्वच्छतामिरजगाव ग्रामपंचायत करीत आहे. या जागेत रोकडोबा मंदिर, जुनी विहिर, वहिवाट रस्ता, गटार असून सार्वजनिक कार्यक्रमासही या जागेचा वापर करण्यात येत होता आणि ताबाही ग्रामपंचायतीचा होता. त्यामुळे कसलाही कर ग्रामपंचायतीला मिळालेला नाही. मात्र जागा विकताना याचा कोणताही विचार केला गेला नाही. विक्री करताना वृत्तपत्रात दिलेली जहिरात जाणीवपूर्वक छोट्या आकारात आणि चुकीचे सिटी सर्व्हेे नंबर टाकून देण्यात आली आहे. जागा विक्री करताना ‘इ निविदा’ प्रकिया राबविली नाही. या जागेची किंमत बाजार भावाप्रमाणे 1 कोटी आहे. मात्र बाजार भावाप्रमाणे जागेची रक्कम 35 लाख 30 हजार दाखविण्यात आली आहे. 

विक्री किमती पेक्षा मुद्राक शुल्क जादा

या जागेची किंमत 35 लाख 30 हजार असून त्यावर शासनाचे मुद्रांक शुल्क 6 टक्केप्रमाणे 2 लाख 11 हजार 800 रूपये येते. मात्र जागेची विक्री अवघ्या 2 लाख 10 हजार रूपयांना करण्यात आली आहे. म्हणजे मुद्रांक शुल्कापेक्षाही 1 हजार 800 रूपये कमी किमतीस जागेची विक्री केली आहे. जगाच्या पाठीवर हा प्रकार दुर्मीळ असावा. 

ग्रामविकास अधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी

लिगंडे यांनी म्हटले आहे की, या जागेचा सर्व व्यवहार संशयास्पद आणि गैरव्यवहार करण्यासाठी झाला आहे. हे करताना सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडचा गैरवापर केला असून त्यावर ग्रामविकास अधिकार्‍यांचा शिक्का आहे. मात्र, स्वाक्षरी बनावट आहे. असा बनावट दाखला खरेदी खतास जोडला आहे. तसेच संस्थेने जागा विक्रीचा ठराव 17 मे 2017 रोजी दाखवली आहे आणि 30 जून 2017 रोजी संस्थेने ग्रामपंचायतीकडे जागा विक्रीसाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून या बाबत 17 मे 2017 च्या सभेची उपस्थिती व इतिवृत्ताची प्रत मागावून घ्यावी. त्यामध्ये सि.स.न. 612 पैकी अर्ध्या क्षेत्रास विक्रीस परवानगी घेतली आहे. जाणीवपूर्वक चतु:सीमा दाखविली नाही. ही जागा खुली दाखवून जागेचे मूल्यांकन कमी होऊन ती अवघ्या 1 लाख 10 हजार रूपयांस विकण्यात आली आहे. या जागेमध्ये असलेली दोन मजली इमारत लपवून संस्थेचे व शासनाचे नुकसान करण्यात आले आहे.

संस्थेचे नुकसान

लिंगडे यांच्या तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधक डॉ. अंजली वाघमारे यांनी बी. व्ही. गायखे यांना चौकशी अधिकारी नेमले होते. चौकशी समितीने वारंवार मागणी करूनही संचालकांनी बँक बॅलन्स सर्टीफिकेट व मालमत्ता रजिस्टर तपासणीसाठी दिले नाही. जागेचे खरेदीखत व साठेखतामध्ये तफावत दिसून आली. या बाबत संस्थेच्या सर्व संचालक मंडळाकडे नोटिशीद्वारे खुलासा मागविण्यात आला होता. मात्र संबंधितांनी कोणीही खुलासा केला नाही. जागेच्या व्यवहारात अटी व शर्थीचे पालन केले नाही, असा दोषारोप चौकशी अधिकार्‍यांनी ठेवला. तसेच विद्यमान संचालक मंडळाने दोन्ही जागा शासकीय मूल्यापेक्षा (बाजार भाव) कमी दराने विक्री केली आहे. त्यामुळे संस्थेचे 34 लाख 16 हजार 564 रूपयांचे नुकसान झाले आहे. 
चौकशी अधिकार्‍यांच्या अहवालावरुन सहाय्यक निबंधक डॉ. वाघमारे यांनी संस्थेचे झालेले 34 लाख 16 हजार 564 रुपयांचे नुकसान संबंधितांकडून 15 दिवसांच्या आत वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. वसुली न झाल्यास मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचेही आदेशात नमूद आहे.