Sun, Jul 21, 2019 02:03होमपेज › Ahamadnagar › अडीच वर्षांत  १२९  बालविवाह; सुमारे ९०० विवाह ‘चोरी चोरी चुपके चुपके’ झाले! 

बालिकावधूंच्या आयुष्याचं सामाजिक’खेळणं 

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 25 2018 11:51PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

सरकारकडून गावोगावी जनजागृती, शिबिरे, तसेच कठोर कायदे करूनही स्त्री भ्रूणहत्यांचे प्रमाण अपेक्षितरित्या अद्यापि कमी झालेले नाहीत. त्यातच बालिका वधूंचा आलेखही दरवर्षी वाढताच असल्याने अजूनही मुलगी ही आई-वडिलांना एक ओझं वाटत असल्याचे चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे. सन 2016 मध्ये 43, 2017 मध्ये 55 तर यावर्षीच्या चार महिन्यांत तब्बल 31 बालविवाहांच्या केसेस चाईल्ड लाईनकडे दाखल आहेत. विशेष म्हणजे, यापेक्षा 7 पट बालविवाह हे चोरी चोरी चुपके चुपके उरकले जात असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

आपल्या देशात लग्नाचे कायदेशीर वय हे मुलींसाठी 18, तर मुलांसाठी 21 वर्षे इतके आहे.  मात्र समाजाच्या मानगुटीवर आजही काही कुप्रथा, चालीरिती बसलेल्या आहेतच. त्यातून मुलगा व मुलीचा भेदभाव केला जातो. मुलीला कायमच सापत्न वागणूक दिली जाते. त्यातच जे वय खेळण्या-बागडण्याचे, मैत्रिणींसोबत मौजमजा करण्याचे, शिकण्याचे असते, अगदी त्याच वयात 14 ते 16 वर्षे वय असलेल्या मुलीचे हात पिवळे करण्याची घाई असते. मानसिक आणि शारीरिक वाढ झालेली नसतानाही तिला लग्नाच्या बोहल्यावर चढविले जाते.  या कोवळ्या वयातच तिच्यावर पती, सासू, सासरे, नणंद, दीर, भावजयी अशा नवीन नात्यांच्या जबाबदारीचे ओझं लादल जाते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांबरोबरच तिचे मानसिक स्वास्थही ढासळण्याची संभावना असते. असे असतानाही मुलीचे आई -वडील आज 18 वर्षांपूर्वीचे मुलींचे लग्न लावून देतात. 

जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण हे वाढतेच आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत चाईल्ड लाईनच्या माध्यमातून बालविवाहाच्या 43 केसेस दाखल झाल्या आहेत. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत 55 केसेस आहेत. त्यापैकी एकट्या जूनमध्ये 16 बालविवाह रोखले आहेत. यावर्षी एप्रिल 2018 ते जुलै 2018 या चार महिन्यांमध्ये 31 बालिका वधू आढळून आल्याचे गंभीर चित्र आहे. या विवाहांची माहिती चाईल्ड लाईनला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत कारवाई करून हे विवाह रोखले आहेत.परंतु हे फक्त अधिकृत आकडे आहेत. यापेक्षा 7 पटीने म्हणजेच 900 पेक्षा अधिक बालविवाह हे गुप्तता पाळत पार पडल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरवर्षी 250 ते 300 कोवळ्या मुलींना बालवयातच बोहल्यावर चढवले जात असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे.

दरम्यान,  ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’, अशा घोषणा देण्यातच आपण इतकी वर्षे रममाण झालो होतो. मात्र खेड्यापाड्यातील भिंतींवर फक्त अशा घोषणा लिहून वा प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन समाज बदलत नसल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यासाठी सर्वांत प्रथम मुलींच्या आई-वडिलांची, तसेच नातेवाईकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि यासाठी  सामाजिक संघटनांनीही पुढे येण्याची गरज आहे.

ग्रामसेवकांसह स्थानिक प्रशासन दक्ष हवयं ः  सोनवणे

बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आमच्याकडे दाखल असलेल्या केसेसपेक्षा हे प्रमाण 7 पट अधिक असण्याची शक्यता आहे. मुलीच्या आई-वडीलांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही जिल्हाभर विशेष कॅम्प घेवून जनजागृती करीत आहोत प्रशासनाकडूनही कठोर कारवाई केली जात आहे. वास्तविक गावातील ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी बालविवाह रोखण्यासाठी निर्भिडपणे कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. तसे झाल्यास निश्‍चितच बालिका वधूंचे प्रमाण कमी होईल.  महत्त्वाचे म्हणजे, आई-वडिलांनी खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलींवर जबाबदारीचे अवजड ओझं लादू नये.      - प्राची सोनवणे, समन्वयक, चाईल्ड लाईन, अहमदनगर