Thu, Apr 25, 2019 15:42



होमपेज › Ahamadnagar › 30 लाखांच्या नव्या घोटाळ्याचा घाट?

30 लाखांच्या नव्या घोटाळ्याचा घाट?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





नगर : प्रतिनिधी

महापालिकेतील 34.65 लाखांचा पथदिवे घोटाळा ताजा असतांना पोलिसांनी तपासादरम्यान ‘नगरोत्थान’च्या चौकशी अहवालानुसारही तपास सुरु केला आहे. या प्रकरणामुळे मनपाचे प्रशासकीय कामकाज कोलमडलेले असतांनाच मनपाच्या तिजोरीवर नव्याने 30 लाखांचा डल्ला मारण्याची तयारी संगनमातून सुरु असल्याची कुजबूज ठेकेदार वर्तुळात आहे. उपायुक्तांनी थांबविलेल्या 15 संशयित फायलींना नुकतीच प्रभारी उपायुक्तांनी मंजुरी दिल्याचीही चर्चा आहे.

स्थायी समितीच्या सभागृहात पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यानंतर वरीष्ठ अधिकार्‍यांकडून प्रत्येक प्रकरणांची बारकाईने तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यानच 15 कामांच्या प्रस्तावांबाबत संशय आल्यामुळे उपायुक्तांनी या फायली बाजूला काढून थांबविल्या होत्या. अनेक दिवसांपासून या फायली उपायुक्तांच्या ‘अ‍ॅन्टीचेंबर’मध्ये तशाच पडून होत्या. ते रजेवर गेल्यानंतर काहींनी या फायली बाहेर काढून उपायुक्तांच्या दालनात सह्यांसाठी प्रलंबित असलेल्या इतर फायलींमध्ये त्या जमा केल्या. प्रभारी उपायुक्तांनी या फायलींवर सह्या नाकारल्याही होत्या. मात्र, नुकत्याने नव्याने ‘भार’ सोसणार्‍या उपायुक्तांकडून या फायलींवर सह्या करुन घेण्यात आल्याचे बोलले जात आहेत. उपायुक्तांच्या ‘अ‍ॅन्टीचेंबर’मधून या फायली बाहेर आल्याच कशा? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे. 

पथदिवे घोटाळ्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी अडचणीत आले आहेत. ज्यांचा थेट संबंध नाही, तेही केवळ सह्या केल्यामुळे अडचणीत आलेत. मनपा वर्तुळात चर्चेत असलेल्या या 30 लाखांच्या फायली लेखा विभागात पोहचून त्याची देयके अदा झाल्यास आणखी एक नवा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेतील काही ठेकेदार, कार्यकर्ते या फायलींच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवून आहेत.






  •