Tue, Jun 18, 2019 22:46होमपेज › Ahamadnagar › भाडेपट्ट्याच्या 27 जमिनी होणार शासनजमा

भाडेपट्ट्याच्या 27 जमिनी होणार शासनजमा

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 13 2018 1:32AMनगर : प्रतिनिधी

पूर्वीच्या काळी 15, 20, 30, 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था, व्यक्तींना नाममात्र दराने जमिनी देण्यात आल्या होत्या. या जमिनींची मूळ मालकी महसूल विभागाची आहे. भाडेपट्ट्याचा करार संपूनही कराराचे नूतनीकरण न केलेल्या जमिनी शंभरावर जमिनींपैकी 27 जमिनींचा ताबा  घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिल्याने बड्या संस्थांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात महसूल विभागाच्या अनेक जमिनी ह्या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, बसस्थानके, यांच्यासह खाजगी व्यक्तींना शेतीसाठीही देण्यात आल्या आहेत. अशा एकूण शंभर पेक्षा जास्त जमिनी जिल्ह्यात आहेत. यामध्ये मोठमोठ्या शैक्षणिक, सामाजिक संस्थांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात जवळपास 15 संस्थांची नावे रडारवर असल्याचे समजते.

भाडेकरार संपल्यानंतर सदर जमिनीच्या भाडेकराराचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. मात्र अनेकांनी भाडेकराराचे नूतनीकरण न केल्याने जमिनीचा शर्तभंग झाला. महसूल विभागाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर संबंधितांना रीतसर नोटिसा बजाविण्यात आल्या. वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक संस्थांनी व व्यक्तींनी प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

शर्तभंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व जमिनीच्या सात-बारा वर शासनाचे नाव लावण्यात आले आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही प्रस्ताव सादर न केल्याने आता ह्या जमिनींचा प्रस्त्यक्ष ताबा घेऊन लिलाव पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. याबाबत नोटिसा मिळाल्यानंतर अनेक संस्थांनी त्यांच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले आहेत. मात्र काही संस्थांनी प्रस्ताव न दिल्याने अशा 27 संस्थांच्या जमिनींचा ताबा घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात होणार्‍या कारवाईत संस्थांकडील जमिनी महसूलच्या ताब्यात जाणार असून, अनेक वैयक्तिक नावाने दिलेल्या जमिनीही शासनजमा होणार आहेत.