Tue, Jul 23, 2019 16:46होमपेज › Ahamadnagar › बोंडअळीचे अडीच कोटींचे अनुदान

बोंडअळीचे अडीच कोटींचे अनुदान

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 21 2018 10:29PMवाळकी : वार्ताहर

नगर तालुक्यातील 89 गावांतील सुमारे 4  हजार 135 शेतकर्‍यांचे कापसाचे क्षेत्र बोंडअळीने बाधीत झाले होते. या बोंडअळी बाधीत क्षेत्राचे पंचनामे होऊन बराच काळ लोटला. आता या शेतकर्‍यांची प्रतीक्षा संपली असून, शेतकर्‍यांना 2 कोटी 54 लाख 59 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात घट झाली. कपाशी पिकासाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाल्याने, बोंडअळी बाधीत कापसाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली होती. मात्र शासनाच्या पंचनाम्याच्या जाचक अटीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकर्‍यांना शासनाने जाचक अटी घातल्याने अनेक शेतकर्‍यांचे पंचनामे अटींच्या फेर्‍यात अडकले होते.

पंचनाम्यासाठी कृषी विभागाने पथके तयार केली होती. नगर तालुक्यातील 89 गावांतील 4 हजार 145 शेतकर्‍यांच्या सुमारे 3 हजार 445 हेक्टर कापूस क्षेत्राला बोंडअळीचा मोठा तडाखा बसला होता. कपाशी पिकाच्या मोठ्या उत्पन्नाच्या आशेवर शेतकर्‍यांनी आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर केला होता. मात्र शेतकर्‍यांच्या आशेवर बोंडअळीने पाणी फेरले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा शासकीय अनुदानाकडे लागल्या होत्या. आता तालुक्यातील बोंडअळी बाधीत शेतकर्‍यांसाठी 2 कोटी 54 लाख 59 हजार रुपये अनुदान मंजुर झाल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.