Sun, May 19, 2019 14:30
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › २३४ शिक्षकांवर होणार कारवाई

२३४ शिक्षकांवर होणार कारवाई

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:51AMनगर : प्रतिनिधी

ऑनलाईन पद्धतीने राज्य पातळीवर झालेल्या बदल्यांमध्ये चुकीची माहिती देणार्‍या 234 शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागात सुरु असलेली फेरतपासणी पूर्ण झाली असून, 6 व 7 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने शिक्षकांची सुनावणी घेणार आहेत. सुनावणीनंतर शिक्षकांवर कारवाईचा आदेश होईल.

संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये बदलीसाठी काही शिक्षकांनी बनावट आणि चुकीचे कागदपत्रे सादर करत बदलीचा लाभ घेतलेला आहे. अनेक शिक्षकांनी अर्ज भरतांना विविध कागदपत्रे जोडणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र अर्जासोबत कागदपत्र न जोडून शासनाची एकप्रकारे फसवणूक केली आहे. अशा शिक्षकांच्या कागदपत्रांची तालुका पातळीवर पडताळणी करण्यात आली. तालुका पातळीवर पडताळणी झाल्यानंतर जिल्हा पातळीवर नुकतीच फेरतपासणी करण्यात आली.

त्यानुसार संवर्ग 1 मध्ये एकूण 1 हजार 156 शिक्षकांपैकी 1 हजार 6 शिक्षक पात्र ठरले असून, 150 शिक्षक अपात्र ठरले आहेत. संवर्ग 2 मध्ये एकूण 622 शिक्षकांपैकी 544 शिक्षक पात्र ठरले असून, 78 शिक्षक अपात्र ठरले आहेत. 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजता नगर, नेवासा व राहुरी तालुक्यातील शिक्षकांची सुनावणी होईल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता तालुक्यातील शिक्षकांना म्हणणे मांडता येईल. तर 7 जुलैला पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, जामखेड व कर्जत तालुक्यातील शिक्षकांना म्हणणे मांडावे लागेल. याबाबत सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना लेखी कळविण्यात आले आहे.

सुनावणी घेतांना या शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची व कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर अपात्र शिक्षकांची यादी तयार करून त्यांच्यावर 28 जूनच्या शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे बदलीचा लाभ घेतलेल्यामध्ये बर्याच शिक्षकांनी जुने अपंग प्रमाणपत्र सादर केलेले आहेत. नवीन नियमानुसार अपंग व्यक्तींना आता त्यांच्या प्रमाणपत्राची ऑनलाईन नोंदणी करून दरवर्षी पडताळणी करणे आवश्यक आहे.

बदलीचा लाभ घेतलेल्या अनेक शिक्षकांकडे पडताळणी केलेले प्रमाणपत्र नाही. यामुळे हे प्रमाणपत्र बोगस असण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात बदलून आलेल्या काही शिक्षकांनी या बदलीत नियमबाह्य पध्दतीने बदलीचा लाभ मिळविलेला आहे. काही शिक्षकांकडे घटस्फोटाचे प्रमाणपत्र नसतांना बदलीचा लाभ घेतलेला आहे. ऑनलाईन बदल्यामध्ये संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये बदलीसाठी पात्र ठरण्यासाठी ज्या शिक्षकांनी एसटीचे जादा अंतराचे बोगस दाखले आणि बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केले आहेत, त्या शिक्षकांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे.