Fri, Apr 19, 2019 08:51होमपेज › Ahamadnagar › दोन एटीएम फोडून २२ लाखांची चोरी

दोन एटीएम फोडून २२ लाखांची चोरी

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 02 2018 11:46PMसंगमनेर : प्रतिनिधी

शहरातील  नाशिक रस्त्यावरील ऑरेंज कॉर्नर व मालदाड रस्त्यावरील  दोन एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी  सुमारे 22 लाख 43 हजार रुपयांची रोकड पळवल्याची  घटना  मध्यरात्री   घडली.

शहरातील  नाशिक रोड लगत असणार्‍या ऑरेंज  कॉर्नरवर गुरूवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने स्टेट बँकेचे एटीएम फोडले. सर्वप्रथम चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केले व त्यानंतर एटीएम तोडून त्यातील 19 लाख 42 हजार 300 रुपये लंपास केल्याचे आढळून आले.  ही रोकड घेऊन चोरट्यांनी आपला मोर्चा मालदाड रस्त्यावरील  कॅनरा बँकेच्या एटीएमकडे वळविला.  गॅस कटरच्या साह्याने संबंधित एटीएम तोडून यातील 2 लाख 65 हजार रुपये घेवून पोबारा केला. अशाप्रकारे अज्ञात टोळीने संगमनेरातून दोन एटीएम फोडून तब्बल  22 लाख 43 हजार रुपयांची जबरी चोरी केली आहे.

दरम्यान, स्टेटबँकेचे एटीएम केअर टेकर नितीन पानसरे यांच्या सकाळी ही बाब लक्षात आली. त्यांनी एटीएमचे चॅनेल मॅनेजर भूषण गायके यांना कळवले. त्यांनी ही माहिती बँकेचे शाखा मॅनेजर पद्माकर धकाते यांना दिली. त्यानंतर बँकेच्या  सर्व अधिकार्‍यांनी पाहणी करून पोलिसांना बोलावले. 

या घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांनी संगमनेरात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्या समवेत पोलिस उपअधीक्षक  अशोक थोरात, पो. नि. अभय परमार, शंकरसिंग रजपूत, गोपाळ उंबरकर हे उपस्थित होते.

याबाबत स्टेट बँकेचे मॅनेजर पद्माकर धकाते यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास स. पो. नि.  गोपाळ उंबरकर हे करत आहे. दुपारी नगर येथून श्वान पथक व नाशिक येथून ठसे तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते.