Wed, Jul 24, 2019 12:46होमपेज › Ahamadnagar › ‘शास्तीमाफी’मुळे 22 कोटी थकबाकी वसूल!

‘शास्तीमाफी’मुळे 22 कोटी थकबाकी वसूल!

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 13 2018 1:32AMनगर : प्रतिनिधी

मालमत्ता करावरील शास्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा फायदा घेत थकबाकीदारांनी 22.26 कोटींचा भरणा केला आहे. त्यामुळे चालू वर्षात 11 मेपर्यंत 39.77 कोटींची वसुली झाली असून यात 17.46 कोटींचा नियमित करदात्यांच्या वसुलीचा समावेश आहे. दरम्यान, 50 टक्के सवलत (11 जूनपर्यंत) काळात केवळ 7.40 कोटींचीच वसुली झाली आहे. यातही थकबाकीपोटी केवळ 3.94 कोटीच जमा झाले आहेत.

2018-2019 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकीसह एकूण 232.64 कोटींची मागणी आहे. यात 191.37 कोटींच्या थकबाकीचा तर 41.26 कोटींच्या चालू कर आकारणीचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात आयुक्‍तांनी शास्तीमाफीची योजना जाहीर करत 11 मेपर्यंत शास्तीमध्ये 75 टक्के सवलत दिली होती. तर एप्रिल महिन्यात कर भरणार्‍या नियमित करदात्यांना सर्वसाधारण करात नियमानुसार 10 टक्के सूट दिली जाते. या दोन्ही सवलतींमुळे 11 मेपर्यंत 32.37 कोटींची वसुली झाली होती. यात शास्तीमाफीचा फायदा घेत थकबाकीदारांनी 18.32 कोटी कर जमा केला होता.

त्यानंतर 11 जूनपर्यंत शास्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलत काळात 7.40 कोटींची वसुली झाली आहे. यात 3 कोटी 94 लाखांचा थकीत कराचा भरणा आहे. तर 3.42 कोटी रुपये नियमित करापोटी जमा झाले आहेत. त्यामुळे एकूण शास्तीमाफीच्या सवलत काळात आत्तापर्यंत 39.77 कोटींची वसुली झाली आहे. यात 22.26 कोटींची जुनी थकबाकी तर 17.46 कोटींच्या नियमित कराचा समावेश आहे. दरम्यान, प्रभाग अधिकार्‍यांनी महिनाभरात 14 कोटींच्या वसुलीचे टार्गेट घेतले होते. त्यातील 50 टक्केच वसुली झाली आहे.